मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. विरोधी पक्षाच्या एका कार्यकर्त्याकडून हे पत्र आलेले आहे, अशी माहिती समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणात पक्षांतर पाहायला मिळालं. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेत सामिल झाले. त्यामुळे भाजप आणि शिवसेना अधिक बळकट होत गेली तर विरोधी पक्षांना खिंडार पडलंय. ईडीची कारवाई, सीबीआयची भीती अशा कारणांवरुन हे पक्षांतर झाल्याचा आरोप भाजपवर सातत्याने होत आहे. याचाच राग मनात धरुन नांदेडच्या एका विरोधी पक्षातील कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांना उद्देशून हे धमकीचं पत्र लिहिलंय. धमकीच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

मंत्रालयाच्या गृह विभागाला मुख्यमंत्र्यांच्या नावे एक गोपनीय पत्र 5 ऑक्टोबरला मिळालं होतं. या पत्राची दखल घेत हे पत्र पुढील चौकशीसाठी मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आलं होतं. तेथून हे पत्र परिमंडळ-1 पोलीस उपायुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आलं. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त यांनी हे पत्र मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याकडे पाठवून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या पत्रात असणारा मजकूर हा मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एका गावातून हे पत्र आलेले आहे.

काय आहे पत्रातील मजकूर?

तुम्ही नेत्यांना ईडी, सीबीआयची भीती दाखवून तसेच आमिष दाखवून पक्षांतर घडवून आणत आहात. आपण अनेक पक्ष फोडले आहेत, हे मला पटलेलं नाही. आपल्या सरकारने राबवलेल्या चुकीच्या धोरणामुळे देशात आर्थिक मंदीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे आमच्यासारख्या व्यापारी कार्यकर्त्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

मी निष्ठावंत कार्यकर्ता असून माझ्या गावात जो कोणी तुमच्या पक्षाचा झेंडा घेऊन फिरला, तसेच भाजपाचा झेंडा हातात दिल्यास आणि ईडीची भीती दाखविल्यास मंत्रालयात घुसून ठार मारु, असा धमकीवजा इशारा पत्रात लिहिण्यात आला आहे. धमकीचे पत्र पाठवणाऱ्याने स्वतःचे नाव, पत्ता आणि फोन नंबर पत्रात दिला असून मरिन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.