राष्ट्रवादी काँग्रेसचे बडतर्फ आमदार रमेश कदम यांना ईडी कोर्टाकडून याआधीच जामीन मंजूर करण्यात आलाय. मात्र त्यांच्याविरोधात स्टेट सीआयडीनं दाखल केलेलं प्रकरण प्रलंबित असल्यानं कदम हे जेलमध्येच आहेत. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ घोटाळ्यात रमेश कदम हे मुख्य आरोपी आहेत. महामंडळाच्या अध्यक्षपदी असताना बोगस लाभार्थी दाखवून रमेश कदमांनी शेकडो कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी रमेश कदमांसह एकूण 12 जणांना अटक झाली आहे. याच घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलं आहे. डिसेंबर 2018 मध्ये कारागृहातील असभ्य वर्तन आणि संबंधित खटल्यातील साक्षीदारांचं संरक्षण या मुद्यांवर मुंबई उच्च न्यायालयानं आमदार रमेश कदम यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.
दरम्यानच्या काळात या ना त्या कारणानं रमेश कदम सतत चर्चेत राहिलेत. मागे एका व्हिडीओ क्लीपमध्ये कदम आर्थर रोड जेलमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना शिवीगाळ करत असल्याचं दिसलं होतं. त्यासंदर्भात रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मात्र, 'पोलिसांनीच मला जातीवाचक शिवीगाळ केली आणि 25 हजारांची लाच मागितली' असा त्यांचा दावा होता. तसेच भायखळा जेलमध्ये असताना वॉर्डन मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणातही प्रकरणातही रमेश कदम यांनी पोलिसांवर आरोप केले होते.