मुंबई : सध्या राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांवर नजर टाकली तर, मुख्यमंत्री सर्वात ताकदवान नेते म्हणून दिसत आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील आगामी मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं आहे. महाराष्ट्रातील गेल्या काही निवडणुकांवर नजर टाकल्यास भाजपने पहिल्यांदा आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलाय. 2014 विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गर्दीतला एक चेहरा होते. मात्र त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत दाखवलेलं नेतृत्व त्यांना आज ताकदवान नेता म्हणून समोर आणत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षात असं काय केलं की त्यांना ताकदवान नेता म्हणून पाहिलं जात आहे.


मित्रपक्ष शिवसेनेला लगाम घातला


देवेंद्र फडणवीस यांनी 2014 मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी शिवसेना सरकारमध्ये सहभागी नव्हती, तर भाजपकडेही बहुमत नव्हतं. भाजपकडे 122 जागा होत्या. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीने विश्वास ठरावावर बहिष्कार टाकून फडणवीस सरकार वाचवलं होतं. त्यानंतर भाजपने शिवसेनेलाही सरकारमध्ये सामिल करुन घेतलं. मात्र सरकारमध्ये असूनही शिवसेना सातत्याने सरकारविरोधी भूमिका घेताना दिसली. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून सरकारवर सतत हल्लाबोल केला जात होता. शिवसेनेच्या मंत्र्यांनी तर राजीनामे खिशात घेऊन फिरत असल्याची धमकी अनेकदा सरकारला दिली. शिवसेनेची सरकारविरोधी भूमिका असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्ष राज्यातील सरकार चालवून दाखवलं. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली आणि राज्यात शिवसेनेची विधानसभेला 50-50 टक्के जागांनी मागणी असतानाही त्यांना 124 जागांवर रोखलं. तर भाजप आणि मित्रपक्षांनी युतीत 164 जागा मिळवल्या. याशिवाय मित्रपक्षाचे सर्वच उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. त्यामुळे मित्र पक्षांना भाजपने जारी केलेलं व्हीपचं पालन करावच लागणार आहे.


विरोधी पक्षातील अनेक बड्या नेत्यांचं पक्षांतर


राज्यात आज विरोधी पक्षाची स्थिती पाहिली तर विरोधी पक्ष नाहीत जमा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील देखील भाजपमध्ये सहभागी झाले आहेत. राज्यातील विरोधी पक्षाला खिंडार पाडण्याचं मोठं श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातं.



भाजपमधील अंतर्गत विरोध संपवला

2014 मध्ये भाजप मोठा पक्ष म्हणून समोर आला, त्यावेळी मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु असताना अनेक मोठी नावं समोर होती. यामध्ये एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावं आघाडीवर होती. पुढे पकंजा मुंडे यांच नाव चिक्की घोटाळ्यात आलं, त्यामुळे त्या बॅकफुटवर गेल्या. मात्र त्यांना क्लिनचीट मिळाली. यंदाच्या निवडणुकीत तर मुख्यमंत्री पदाची महत्त्वकांक्षा बाळगणारे विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना तर पक्षाने तिकीटच दिलं नाही. या दोन नेत्यांना तिकीट मिळालं नाही यामध्ये मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची भूमिका असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.


सरकार विरोधातील आंदोलने चातुर्याने शांत केली


मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी, दुष्काळ या मुद्द्यांवर विरोधी पक्षाने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या चातुर्याने या सगळ्या मुद्द्यांवर विरोधकांना वेसण घातलं. लोकसभा निवडणुकीतील निकालावरुन हे स्पष्ट झालं की, या मुद्द्यांवरुन भाजप सरकारला काहीही फटका बसला नाही.


पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील यश


देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षात राज्यातील महापालिका, नगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भाजपने मोठं यश संपादित केलं. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने विरोधात उमेदवार दिला असतानाही भाजपने ही जागा जिंकली. नाशिक महानगरपालिकेमधील राज ठाकरे यांच्या मनसेची सत्ता उलथून लावली आणि त्याठिकाणी भाजपचा महापौर बसवला.


राजकारणातील देवेंद्र फडणवीस यांचा वेग पाहिला तर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी असतील अशीही चर्चा आहे. मात्र यासाठी त्यांना भाजपमध्ये अमित शाह आणि योदी आदित्यनाथ यांचा मुकाबला करावा लागणार आहे.