मुंबई : पवई पोलिसांनी अशा सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत जे महत्त्वाच्या शहरांमध्ये चोरी करण्यासाठी चक्क विमानाने प्रवास करायचे आणि चोरी केल्यानंतर पुन्हा विमान पकडून दुसऱ्या शहरांमध्ये आपलं सावज हेरण्यासाठी निघायचे. या चोरट्यांवर आतापर्यंत मुंबई, जयपूर, पुणे, हैदराबाद, गुजरात अशा सात शहरांमध्ये 215 गुन्हे दाखल आहेत. तौसिफ कुरेशी, गौस पाशा मयुद्दीन शेख सलीम हबीब कुरेशी उर्फ मुन्ना अशी या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
19 सप्टेंबर रोजी पवईच्या जलवायु परिसरामध्ये एका माजी नौदल अधिकाऱ्याच्या घरात या चोरट्यांनी तब्बल 24 लाख 47 हजार 700 रुपयांची चोरी केली होती. एका कारमधून येऊन घरात घुसून चोरी करत असताना हे चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले होते. तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ही चोरी या तिघांनी केली असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यावरून मुंबई पोलिसांनी हैदराबाद परिसरात तब्बल दहा दिवस आसिफ आणि गौस पाशा यांच्यावर पाळत ठेवून अखेर या दोघांना ताब्यात घेतलं आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर बंगळुरुमध्ये पळण्याच्या प्रयत्नात असताना या चोरट्यांचा मास्टर माईंड मुन्ना याला बेड्या ठोकल्या.
या चोरट्यांकडून पवईत चोरी करण्यात आलेला 90 टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला महत्त्वाचं म्हणजे यातील मुख्य आरोपी मुन्ना याच्यावरचं एकट्या पुणे शहरात 102 चोरीचे गुन्हे दाखल आहेत. चक्क चोरी करण्यासाठी विमानाने प्रवास करणाऱ्या या भामट्यांनी आणखी किती गुन्हे केले आहेत याचा तपास सध्या पवई पोलिस करत आहेत.
यापूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये विमानाने येऊन पुण्यात दरोडे टाकणाऱ्या चोरांच्या एका टोळीला पकडण्यात आलं होतं. पुण्यात पकडलेले हे आरोपी मॉलमध्ये चोरी करताना पकडले गेले होते. विमानाने प्रवास करणाऱ्या वेगवेगळ्या शहरात चोऱ्या करणाऱ्या या टोळीने हैदराबाद, मुंबई, दिल्ली अशा अनेक महानगरात चोऱ्या केल्याची कबुली दिली होती.
पुण्यातच गेल्यावर्षीही अशा प्रकारे विमानाने येऊन चोऱ्या करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली होती. ही टोळी हरियाणा येथील चोरांची होती. ही टोळी एटीएम फोडण्यात वाकबगार होती. या टोळीला अटक केल्यानंतर एटीएम फोडीचे जवळपास आठ गुन्हे उघडकीस आले होते. पुण्यातील वाकड पोलिसांनी या टोळीला हरियाणामध्ये तळ ठोकून अटक केली होती. त्यावेळी वाकड पोलिसांच्या या तपास कामाला पन्नास हजार रुपयाचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं.
उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे राहणाऱ्या आणि विमानाने पुण्यात येऊन घरफोड्या करणाऱ्या चोरालाही पुणे पोलिसांनी ऑगस्ट 2019 मध्ये अटक केली होती. हा चोर फक्त विमानानेच प्रवास करायचा नाही तर ज्या शहरात चोऱ्या करायच्या असतील तेथील लक्झरी स्टार हॉटेलमध्ये वास्तव्य करायचा. या चोरालाही वाकड पोलिसांनीच जेरबंद केलं होतं.
दिल्ली पोलिसांनीही यापूर्वी अशाच प्रकारे विमानाने शहरात येऊन कार चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक केली होती. त्यावर तर तब्बल एक लाख रुपयाचं इनाम ही जाहीर करण्यात आलं होतं. ऑगस्ट 2018 मध्ये दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या सफरुद्दीन नावाच्या टोळीच्या म्होरक्याने तब्बल 500 कार चोरून त्याची विक्री केली होती.