मुंबई : लोकांनी कोरोनाचा बाऊ केला आहे. मुंबईत एका वर्षात इतर आजारांमध्ये किती मृत्यू होतात. त्यापेक्षा कोरोनाने कमीचं मृत्यू झाले असतील. सरकारने लोकांना आश्वास्त केलं पाहिजे, असे मत विख्यात शल्यविशारद डॉ. रवी बापट यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी पु. ल. देशपांडे, शरद पवार यांच्यासोबतचे अनेक किस्से डॉक्टरांनी सांगितले.


विख्यात शल्यविशारद डॉ. रवी बापट आज एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह राजकारण, कला क्षेत्राविषयी आपली परखड मते मांडली. भारतीय लोकांनी कोरोनाचं बाऊ केला आहे. सरकारने त्यांना आश्वस्त करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. कोरोना लस सर्वांनाच टोचण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले.


रुग्णाला बरे करणे हा डॉक्टराचा पहिला उद्देश असायला हवा : डॉ. बापट


माझ्या मते वैद्यक क्षेत्र हे पैसे घेऊन ज्ञान देण्याचे क्षेत्र नाही. पैसे घ्या मात्र, त्यालाही मर्यादा असाव्यात. जगामध्ये पैसे दिल्याशिवाय कुठलीही गोष्ट होत नाही. मात्र, सर्वसामान्यांची लूबाडणूक नको. मुंबईतील अनेक पंचतारांकीत रुग्णालयांमध्ये हे पाहायला मिळते. एखाद्या ऑपरेशला अमिताभला 3 कोटी दर दुसऱ्याला 3 हजार रुपये? ऑपरेशन तर तेच आहे. वेळही तेव्हढाच लागणार. मग इतका विरोधाभास कसा? असा प्रश्नही डॉक्टर बापट यांनी उपस्थित केला.


रुग्णाला बरे करणे हा डॉक्टरांचा पहिला उद्देश असावा आणि आवश्यक आहे तेवढीच औषधे लिहून द्या. रुग्णांच्या कुवतीप्रमाणेच त्यांच्याकडून पैसे घ्या, असा सल्लाही डॉ. बापट यांनी नव्याने वैद्यकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या तरुणांना दिला आहे. डॉक्टर म्हणून तुम्ही समाजात आलात तर तुम्ही समाजातील महत्वाचे व्यक्ती आहात. समाजाचा घटक म्हणून समाजाला एकत्र ठेवण्याची जबाबदारीही तुमची आहे.


पु. ल. देशपांडे यांची योग्य शब्दांची निवड आणि त्याचं विनोदात रुपांतर करणे हे याचं मला नेहमी अप्रुप वाटत आलंय. यावेळी सुनीता देशपांडे यांच्या बरोबरचे किस्सेही डॉ. बापट यांनी सांगितले. एकदा एन्डोस्कोपीबद्दल मी वहिनींना सांगत होतो. यात दहा मिनिटे गेले असतील. पु. ल. तिथं होते. आम्ही इतकं गंभीर बोलत असताना पुलंनी तिथंही विनोद केला. पुलंचा हा स्वभावचं मला जास्त आवडत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.


शरद पवार.. दैवी देणगी लाभलेला माणूस : डॉ. बापट


शरद पवार यांना दैवी देणगी लाभली असल्याचे डॉक्टर म्हणाले. कारण, पवार फक्त दोन ते तीन तास झोप घेतात. मात्र, ही झोप फार गाढ असते. त्यांना झोप कमी आहे. ते कुणाचंही बोलणं संपूर्ण ऐकून घेतात. कुणालाही वाटणार नाही की पवारांनी माझं ऐकून घेतलं नाही. पवार याचं व्यवस्थापन खूप चांगलं आहे. पेशंट म्हणून तर ते फार प्रामाणिक आहेत. जी औषधे दिली ती निमूटपणे घेतात. अनेक ऑपरेशनंतर त्यांनी काहीही तक्रार न करता कामही केली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.