मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या चाचणीचे दर कमी करत 780 रुपये इतके निश्चित केल्यानंतर सुद्धा काही खाजगी लॅब दुप्पट तिप्पट पैसे अनेकांकडून लुबाडत असल्याचं एबीपी माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये समोर आलं. आता याची दखल घेत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी अशा जादाचे पैसे घेऊन लोकांना लुबाडनाऱ्या खाजगी पॅथॉलॉजीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय, सोमवारपासून मुंबईतील खाजगी लॅबच्या तपासणीचे आदेशाबाबत महापौर यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांच्याशी तातडीने चर्चा केली.
जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लक्षण दिसत असतील आणि त्याला कोरोना टेस्ट करावयाची आहे. तर त्याने सरकारने नुकतेच कमी केलेल्या दरात (780 रुपये) मध्ये ही टेस्ट करावी. सोबतच, हा नियम आणि दर खाजगी पॅथॉलॉजीसाठी सुद्धा असताना मुंबईतील छोट्या मोठ्या खाजगी लॅब या दुप्पट तिप्पट पैसे घेत असल्याचा पर्दाफाश माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये करण्यात आला. मुंबईत अनेक खाजगी लॅब या कोव्हीड आरटीपीसीआर टेस्ट साठी अजूनही 1400 ते 1800 रुपये घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दोषी आढळणाऱ्या, नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पॅथोलॉजीवर कारवाई करा असे आदेश महापौरांनी दिलेत. या विषयासंदर्भात सर्व वॉर्डच्या आरोग्य अधिकाऱ्यांची सोमवारी महापौरांनी पेंग्विन कक्षात बैठक बोलावली आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकार सहाव्यादा कोरोना चाचणीच दर कमी करत 780 रुपये इतके करत असल्याच सांगितलं. त्यानंतर मोठ्या नामांकित खाजगी लॅबने हे दर तातडीने कमी केले. मात्र, मुंबईतील इतर अनेक छोट्या खाजगी पॅथॉलॉजीने स्वॅब (swab) कलेक्शन करून मोठ्या पॅथॉलॉजीमध्ये चाचणी करून ते कोरोना चाचणीचे रिपोर्ट देताना 1400 ते 1800 रुपये घेत असल्याचं या माझाच्या स्टिंगमध्ये समोर आलं आहे. या पॅथॉलॉजी अशाप्रकारे लोकांना कोरोना टेस्ट मागे लुबाडताय. त्यांना कोरोना टेस्टसाठी परावनगी नसताना हे कसे करतात असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय. त्यामुळे कोरोना टेस्ट करावयाची असल्यास सरकारी रुग्णलाय, टेस्ट सेंटर किंवा नामांकित खाजगी लॅब ज्यांना परावनगी आहे व ज्या सरकारने निश्चित केलेल्या दरामध्ये टेस्ट करतायेत अशा ठिकाणी टेस्ट करण्याचं आवाहन प्रशासनाकडून केला जात आहे.
संबंधित बातमी :
कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये सहाव्यांदा कपात; आरोग्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा