मुंबई : मुंबईच्या नागपाड्यात सुरू असलेल्या आंदोलनावरून आयोजक आणि आंदोलकांमध्ये समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. दिल्लीच्या शाहीनबागच्या धर्तीवर मुंबईत सुरू असलेलं 'मुंबई बाग' आंदोलन मागे घेण्याची तारीख आयोजकांकडून निश्चित करण्यात आली आहे. आंदोलनाचे आयोजक नसीम सिद्दीकी यांनी ही माहिती दिली. परंतु, आंदोलक महिलांनी मात्र आंदोलन मागे घेणार नसल्याचं सांगितलं आहे.


'आमच्या पर्यंत असा कोणताही निर्णय आलेला नाही त्यामुळे जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचा शांतीपूर्ण लढा असाच सुरू राहील' असे आंदोलक महिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुंबई बाग आंदोलन संपण्याची शक्यता निवळली आहे. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात गेले 10 दिवस नागपाड्यात मुस्लिम महिलांचं हे आंदोलन सुरू आहे.


गुरुवारी संध्याकाळी पाच वाजता हे आंदोलन आम्ही मागे घेणार असल्याची माहिती आयोजक नसीम सिद्दीकी यांनी प्रसार माध्यमांना दिली. कोणतीही परवानगी न घेता हे आंदोलन सुरू आहे. तसेच यामुळे मुंबईत इतर ठिकाणी देखील विनापरवाना आंदोलन सुरू होत असल्याने आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेत असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. मात्र महिलांनी याबाबत आम्हाला काहीच माहिती नसून जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आमचा शांतीपूर्ण लढा असाच सुरू राहील, असं सांगितलं आहे.


गेल्या दहा दिवसांपासून मुंबईतील नागपाडा विभागात सीएए आणि एनआरसी विरोधात मुस्लिम महिलांचे आंदोलन सुरू आहे. काल या आंदोलकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. या भेटीत अनिल देशमुख यांनी महाराष्ट्रात हा कायदा लागू करण्यात येणार नसल्याचे आश्वासन त्यांना दिले होते. मात्र तरीदेखील जोपर्यंत विधानसभेत या कायद्याच्या विरोधात कायदा बनत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचे आंदोलक महिलांनी सांगितले होते आणि तोपर्यंत आपण आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचंही सांगितलं होतं. मात्र काल रात्री उशीरा झालेल्या बैठकीनंतर आयोजक नसीम सिद्दीकी यांनी आंदोलन मागे घेणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.


नागपाड्यातल्या या आंदोलनात मुंबईतल्या विविध भागातून महिला सहभागी झाल्या आहेत. घरदार, संसार, मुलं हे सर्व सांभाळून या महिला पद्धतशीर नियोजन करुन नागपाड्यातल्या आंदोलनात सहभागी होत आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. जोपर्यंत कायदा मागे घेतला जात नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरुच राहील असा निर्धार या महिलांनी केला आहे. हातात तिरंगा आणि फलक घेत या महिला केंद्र सरकारविरोधात घोषणा देत आहेत.


शाहीन बाग परिसरात दीड महिन्यापासून आंदोलन


दिल्लीत शाहीन बाग परिसरात दीड महिन्यापासून एक अभिनव आंदोलन सुरू आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसीविरोधात या परिसरातल्या महिला एकत्रित आल्या आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात कुठलाही नेता नाही, त्यामुळे हे आंदोलन चर्चेचा विषय बनलं आहे. आपले घर सांभाळतानाच या महिला सरकारविरोधात आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. दिल्लीतल्या थंडी, ऊन, वारा पावसाची पर्वा न करता हे आंदोलन सुरू आहे.


सीएए आणि एनआरसीविरोधात 300 कलाकारांचं खुलं पत्र


सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील अनेक भागात निषेध होत आहे. बॉलिवूड कलाकारांनीही या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केलं आहे. यात चित्रपट निर्माता मीरा नायर, नंदिता दास, अभिनेता नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, पार्थ चॅटर्जी, अनिता देसाई, किरण देसाई, टीएम कृष्णा, आशिष नंदी आणि गायत्री चक्रवर्तीसह 300 पेक्षा अधिक कलाकारांचा समावेश आहे. 300 पेक्षाही अधिक जणांची स्वाक्षरी असलेल्या कलाकारांनी खुलं पत्र देशातील जनतेला लिहिलं आहे.


संबंधित बातम्या : 


दिल्लीच्या शाहीनबाग आंदोलनाच्या धर्तीवर मुंबईतही CAA, NRC विरोधात महिलांचा ठिय्या


CAA Protest | मुंबईतील महिलांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस, विद्यार्थी नेता उमर खालिदचीही हजेरी