मुंबई : दिल्लीप्रमाणेच मुंबईतील महिलादेखील एनआरसी आणि सीएएविरोधात आता रस्त्यावर उतरल्या आहे. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महिलांच्या या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी पुरुषदेखील या आंदोलनात उतरलेत. आंदोलनाची तीव्रता पाहता इथे कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरुच राहणार असल्याचं आंदोलक महिलांनी म्हटलंय.


एकीकडे दिल्लीच्या शाहीनबाग परिसरात महिलांचे गेले काही दिवस सीएए आणि एनआरसी विरोधात अविरत आंदोलन सुरू असताना मुंबई मधील महिला देखील यातून प्रेरित होऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. मुंबई सेंट्रल येथील नागपाडा विभागात रविवारी रात्रीपासून शेकडो महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. महिलांचा या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तितक्याच प्रमाणात पुरुष देखील या ठिकाणी आंदोलनात उतरले आहेत. आंदोलनाची तीव्रता पाहता मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे. हातात तिरंगा आणि फलक घेत या महिलांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. जोपर्यंत हा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत शाहीनबाग प्रमाणेच आम्ही देखील ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.



शाहीनबाग परिसरात महिन्याभरापासून आंदोलन -
दिल्लीत शाहीनबाग परिसरात गेल्या महिनाभरापासून एक अभिनव आंदोलन सुरू आहे. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात या परिसरातल्या महिला एकत्रित आल्या आहेत. कुठलाही नेता नसलेलं हे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. अनेक दिवसांपासून हे आंदोलन चर्चेचा विषय बनला आहे. आपले घर सांभाळतानाच या महिला सरकार विरोधात आवाज बुलंद करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. दिल्लीतल्या थंडी, ऊन, वारा पावसाची पर्वा न करता हे आंदोलन सुरू केलं आहे.
सीएए आणि एनआरसीविरोधात 300 कलाकारांचं खुलं पत्र -
सीएए आणि एनआरसीविरोधात देशातील बर्‍याच भागात वारंवार निषेध होत आहे. आता बॉलिवूडकरांनीही या कायद्याचा विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांचे समर्थन केलं आहे. यात चित्रपट निर्माता मीरा नायर, नंदिता दास, अभिनेता नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, जावेद जाफरी, पार्थ चटर्जी, अनीता देसाई, किरण देसाई, टीएम कृष्णा, आशीष नंदी आणि गायत्री चक्रवर्तीसह 300 पेक्षा अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. 300 पेक्षाही अधिक जणांची स्वाक्षरी असलेलं खुलं पत्र देशातील जनतेला लिहलं आहे.

CAA NRC Protest | सीएए, एनआपसीविरोधात मुंबई सेंट्रलच्या नागराड्यात महिलांचं ठिय्या आंदोलन