डोंबिवली : 'एक कॅमेरा देशासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी...' ही संकल्पना राबवत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत कल्याण डोंबिवली शहरातील दानशूर व्यक्तींनी मागील तीन महिन्यात 3000 हून अधिक ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. डोंबिवली विष्णुनगर पोलीस ठाणे आणि भाजप नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या वतीने शहरातील सोसायट्यांना 1000 सीसीटीव्ही कॅमेरे देण्यात आले आहेत. डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे यांच्या हस्ते नागरिकांनी सुरक्षेसाठी तिसऱ्या डोळ्याची मदत स्वीकारली.


शहरातील गुन्हेगारी वाढत असतानाच या गुन्ह्याची उकल सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने कमीत कमी कालावधीत करणे तसंच खऱ्या गुन्हेगाराला अटक करणं पोलिसांना शक्य होत आहे. साहजिकच शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र अनेक ठिकाणी दुकानाबाहेर, सोसायट्यामध्ये तसंच गल्लीबोळात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने पोलिसाच्या तपासाला अडथळे येतात. गुन्हेगारावर वचक बसवून त्यांच्यात भीती निर्माण करत त्यांना गुन्हे करण्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी एक कॅमेरा देशासाठी समाजाच्या सुरक्षिततेसाठी या संकल्पने अंतर्गत शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचं आवाहन केलं होतं. आतापर्यंत पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात 3000 कॅमेरे लावण्यात आले आहेत. 


भाजप नगरसेवक विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आणि डोंबिवली विष्णू नगर पोलीस ठाण्याच्या वतीने डोंबिवली शहरातील विविध सोसायट्यांना एक हजार सीसीटीव्ही कॅमेरे वाटण्यात आले. यावेळी डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त जे डी मोरे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने कॅमेरा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने या कॅमेऱ्याचं महत्त्व वाढल्याचं नमूद केलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या