बीड : पारधी समाजातील व्यक्तींना आजही गुन्हेगारी कृत्य करण्याचा संशयातून बघतले जाते. हाच संशय कमी व्हावा म्हणून पारधी समाजातील एका कुटुंबाने चक्क आपल्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कपाळावर लागलेला गुन्हेगारीचा कलंक पुसण्यासाठी या कुटुंबाने एक पाऊल पुढे टाकले आहे.


नगर-बीड जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेलं आष्टी तालुक्यातील छोटसं गाव वाकी. याच गावातील ओसाड माळरानावर असलेल्या या घरावर चारही बाजूने सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. कुणा चोरापासून घराचा संरक्षण व्हावं म्हणून हे सीसीटीव्ही लावलेले नाहीत तर इतर कुठे घटना घडली तर त्या घटनेत या घरातील कोणीही सदस्य नव्हतं हे सिद्ध करण्यासाठी ते सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत.


अल्पभूधारक शेती कसून काळे कुटुंब आपला उदरनिर्वाह भागवत आहे. गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष केले जाते. वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही, त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे कुटुंब पुरते हतबल झाले आहे.


याच कुटुंबातील मोठा मुलगा शामल दहावी शिकला आहे. शामलची पत्नी अर्चना हिची बारावी झाली आहे. मुलगा आणि सूनेने शिकून नोकरी करण्याची इच्छा कुटुंबीयांचे आहे. मात्र परिसरात कुठे घटना घडली की चौकशीसाठी पोलीस घरी येतात, म्हणूनच आता या कुटुंबाने स्वतःला सीसीटीव्हीच्या कैदेत ठेवले आहे.


पारधी समाजातील अनेक मुले आज शिक्षण घेऊन मोठा पदावर ती गेली आहे. या समाजातील नवीन पिढी आज शिक्षणाच्या एका उंबरठ्यावर उभी आहे. म्हणूनच सरसकट समाजावर ते गुन्हेगारीचा शिक्का बसवणं चुकीचे आहे. आता जर पारधी समाजातील कुटुंबाला स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी पुढे येत असेल तर याचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे


कोणीही व्यक्ती जन्मताच गुन्हेगार असत नाही आणि एखाद्या जातीत जन्माला आले म्हणजे ती व्यक्ती गुन्हेगार असते असं अजिबात नाही. मात्र आजही पारधी समाजातील कुटुंबाकडे संशयी नजरेने बघितले जाते आणि हाच संशय दूर करण्यासाठी काळे कुटुंबाने केलेला हा प्रयत्न केवळ कौतुकास्पदच नाही तर नेत्रदीपक सुद्धा आहे.