Water Taxi : मुंबई ते बेलापूर हे अंतर आता फक्त 35 मिनिटात पार करता येणार आहे. कारण नवीन वर्षात जानेवारी महिन्यात मुंबई ते नवी मुंबईच्या दरम्यान जलवाहतूक सुरू होणार आहे. ही जलवाहतूक अत्याधुनिक अशा वॉटर टॅक्सी मधून करता येणे शक्य होणार आहे. वॉटर टॅक्सी तब्बल 25 नोट्स इतक्या वेगाने धावते. त्यामुळे कमीत कमी वेळेत मुंबईपासून नेरूळ, बेलापूर, जेएनपीटी आणि एलिफंटा इथे पोहोचता येईल. त्यासाठी 'बुक माय बोट डॉट कॉम' या वेबसाइटवर तिकीट उपलब्ध असेल.


भाऊचा धक्का इथे असलेल्या डोमेस्टिक क्रुज टर्मिनल मधून आपल्याला या हाई स्पीड वॉटर टॅक्सी चा प्रवास करता येईल. बेलापूर आणि नेरुळ येथे याच जलवाहतुकीसाठी जेट्टी देखील निर्माण करण्यात आलेल्या आहेत. सध्या नेरूळ किंवा बेलापूर इथून सीएसएमटी पर्यंत पोहोचण्यासाठी लोकलने प्रवास करायचा झाला तर एक तास पाच मिनिटे इतका वेळ लागतो. तोच प्रवास रस्ते मार्गाने करायचा असल्यास रस्त्यावरचे खड्डे, अनेक ठिकाणी मिळणारे ट्राफिक, वाशी इथला टोल आणि असंख्य अडचणींचा सामना करून दीड ते दोन तास आपल्या लागतात. त्या मानाने मुंबई बेलापूर ही जलवाहतूक सर्वात वेगवान समजली जात आहे. इन्फिनिटी हार्बर सर्विस या कंपनीला जलवाहतुकीचे लायसन्स मिळाल्याने त्यांनी तीन मार्गांवर ही जलवाहतूक सुरू करण्याचे ठरवले आहे.


पहिला मार्ग
नेरूळ ते बेलापूर बेलापूर ते जेएनपीटी जेएनपीटी एलिफंटा आणि एलिफंटा ते नेरूळ


दुसरा मार्ग
डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल भाऊचा धक्का ते जेएनपीटी एलिफंटा ते नेरूळ


तिसरा मार्ग 
डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल भाऊचा धक्का ते बेलापूर ते नेरूळ ते डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल 


इन्फिनिटी हार्बर सर्विस कंपनीने दोन प्रकारच्या वॉटर टॅक्सी सध्या सुरू केले आहेत. त्यातील एका वॉटर टॅक्सीची क्षमता 32 प्रवाशांची तर दुसऱ्या वॉटर टॅक्सीची क्षमता 50 प्रवाशांची आहे. या वॉटर टॅक्सी उन्हाळा आणि हिवाळा प्रमाणे पावसाळ्यात देखील सुरू राहणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दर आकारले जाणार आहेत.


वॉटर टॅक्सीचे दर
एका दिवसीय एका फेरीसाठी अंदाजे 500 ते 750 रुपये तिकीट असेल.
एक दिवसीय जाऊन येऊन अशा दोन फेऱ्यांसाठी अंदाजे 800 ते 1200 रुपये तिकीट असेल.
तर एक महिन्याचा पास बारा हजार रुपयांना उपलब्ध असेल. या पासचा वापर कोणत्याही मार्गावर कितीही वेळा प्रवास करण्यासाठी करता येईल.


सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री साडे सहा वाजेपर्यंत दर तासाला या वॉटर टॅक्सी उपलब्ध असणार आहेत. यावर लाईफ जॅकेट तर आहेतच सोबत अग्निशमन यंत्रणा देखील असणार आहे. जानेवारी महिन्यात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी या वॉटर टॅक्सी सर्व्हिसचे उद्घाटन करण्याची शक्यता आहे. या जलवाहतुकीच्या पर्यायामुळे मुंबई आणि नवी मुंबई मधील अंतर खूप कमी वेळेत पार करता येईल.


महत्त्वाच्या बातम्या :