मुंबई : कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल 8 हजार 67 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1766 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने आठ हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.
राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज चार ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 454 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 157 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
मागील सहा दिवसातील रूग्ण संख्या
30 डिसेंबर - 5368 रूग्ण
29 डिसेंबर - 3900 रूग्ण
28 डिसेंबर – 2172 रूग्ण
27 डिसेंबर – 1426 रूग्ण
26 डिसेंबर – 1648 रूग्ण
25 डिसेंबर – 1485 रूग्ण
राज्यात आज 8 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज आठ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 24 हजार 509 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 9 हजार 96 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 75 हजार 592 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1079 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 90 , 10, 153 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. मुंबईत आज 5 हजार 428 नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात आज एका दिवसात नवीन 683 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
देशभरात कोरोना संसर्गाची स्थिती
सध्या देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 24 तासात देशात नऊ हजाराहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 9 हजार 195 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, 302 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर देशात ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत देखील वाढ होत आहे. सध्या देशभरात ओमायक्रॉनची संख्या ही 800 च्या जवळपास गेली आहे. देशातील 21 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. मागच्या 24 तासात ओमायक्रॉनच्या 128 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या ही 781 आहे. तर उपचारानंतर 241 ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या:
- ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
- मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना प्रकरणाची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल, अहवाल सादर करण्याच्या सूचना
- उदयपूरमध्ये ओमायक्रॉनबाधित रुग्णाचा मृत्यू, 14 डिसेंबरला झाली होती लागण