मुंबई : सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली आहे.


सहायय्क पोलीस निरीक्षक सुभाष सामंत आणि हवालदार बाजीराव सरगर यांनी साध्या गणवेशात पत्रकार परिषदेत हजेरी लावल्याचं उघड झाल्याने आता याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

याप्रकरणी विखे-पाटलांनी तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याशी फोनवरुन संपर्क साधून या संपूर्ण प्रकाराबाबत विचारणा केली. त्यावेळी आपण अशी कोणतीही परवानगी पोलिसांना दिली नसल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं.

त्यामुळे सरकार विरोधी पक्ष नेत्यांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप विखे-पाटलांनी केला. तसेच विरोधी पक्ष नेत्यांचे फोनही टॅप होत असल्याचा आरोप विखे-पाटलांनी केला आहे. ‘हे फोन कोण टॅप करतं त्या अधिकाऱ्यांचं नावही ठाऊक आहे. पण जेव्हा माझ्याकडे पुरावे येतील तेव्हा मी ते जाहीर करेन.’ असंही विखे-पाटील म्हणाले.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणी विखे-पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहेत.