ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागात त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स नावाचं दुकान उघडून लोकांना नवनव्या स्कीम दाखवून पैसे गुंतवण्यास सांगणाऱ्या एका इसमाला नौपाडा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नौपाडा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत 13 लोकांनी याबाबत तक्रार केली असून त्यांची तीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. मात्र एकूण अडीचशे नागरिकांचे पैसे असल्याने साडेचार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा दावा या लोकांनी केला आहे. तर या बाबत पुढील तपस नौपाडा पोलिस करीत आहे.
ठाणे पश्चिम, विष्णूनगर इथे संतोष शेलार याचं त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्स नावाचं दुकान होतं. मराठी माणूस प्रगती करतोय त्याला साथ द्या, अशी बतावणी करुन मराठीचे कार्ड दाखवून शेलारने अनेक गिऱ्हाईकांना आकर्षित केलं. व्यवसायाचा जम बसताच त्याने सोनं खरेदी करण्यासाठी अनेक नव्या योजना आणल्या. दर महिन्याला एक हजार रुपये ते गुंतवणूकदारांना जमेल तेवढी रक्कम योजनेत गुंतवा आणि नंतर 15 महिन्यांनी जमा झालेल्या रकमेत सोनं खरेदी करा किंवा काही हजार रुपये म्हणजेच 18 हजार रुपये एवढी तुमची रक्कम परत घ्या, अशी एक योजना तयार करुन त्याने प्रसिद्धी केली.
या आकर्षक योजनेच्या आमिषामुळे अनेकांनी त्यात रक्कम भरण्यास सुरुवात केली. मात्र जेव्हा 15 महिन्यांनंतर गुंतवणूकदार सोनं खरेदी करण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात गेले असता, तिथे टाळं आढळलं. गुंतवणूकदारांनी मालक संतोष शेलारला फोन करुन संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने फोन बंद करुन ठेवल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं गुंतवणूकदारांच्या लक्षात आलं. अखेर गुंतवणूकदारांनी या प्रकरणी पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दरम्यान, त्रिमूर्ती रत्न ज्वेलर्सचा मालक संतोष शेलारविरोधात नौपाडा पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
नवनव्या स्कीम दाखवून ठाण्यात ज्वेलर्स मालकाकडून कोट्यवधींची फसवणूक
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
28 Jun 2019 09:44 AM (IST)
मराठी माणूस प्रगती करतोय त्याला साथ द्या, अशी बतावणी करुन मराठीचे कार्ड दाखवून शेलारने अनेक गिऱ्हाईकांना आकर्षित केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -