मुंबई : बॉलिवूड अभिनेता आदित्य पांचोली विरोधात मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने आदित्य पांचोलीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती.


या तक्रारीनंतर आदित्य पांचोलीविरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये 376, 328, 384, 341, 342, 323 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून प्रकरणाची चौकशी शुरु आहे, मात्र हे प्रकरण दहा वर्ष जुनं असल्याने पुरावे गोळा करण्यास अनेक अडचणी येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. प्रकरण घडलं त्यावेळीही पीडित अभिनेत्रीने याबाबत तक्रार केली होती, मात्र त्यावेळी आदित्य पांचोलीला समज देऊन सोडून देण्यात आलं होतं.


आदित्य पांचोलीने अनेकदा आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप संबंधीत बॉलिवूड अभिनेत्रीने केला आहे. अभिनेत्रीच्या बहिणीने ई-मेलद्वारे याबाबत लेखी तक्रार दाखल केली होती.





आदित्य पांचोलीकडून आरोपांचं खंडन


माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून माझ्याविरोधात विचारपूर्वक रचलेलं कारस्थान आहे. मला यामध्ये फसवलं जात असून याबाबत माझ्याकडे पुरावे आहे. संबंधीत अभिनेत्रीविरोधात मी मानहानीचा दावा दाखल केला आहे. हीच मानहानीची तक्रार मागे घेण्यासाठी या अभिनेत्रीने तिच्या वकीलांना माझ्या घरी पाठवल होतं. मात्र मी तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने मला संबंधीत अभिनेत्रीने बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली होती, असा दावा आदित्य पांचोलीने केला आहे.


आणखी वाचा : आदित्य पांचोली विरोधात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीकडून बलात्काराची तक्रार