ठाणे : देशात रेल्वेच्या तिकिटांचा होणारा काळा बाजार रोखण्यात रेल्वे प्रशासनाला आणि सुरक्षा यंत्रणेला अजूनही पूर्णपणे यश आलेले नाही. आरपीएफ आणि जीआरपी यासाठी वारंवार अभियान राबवत असतात मात्र त्यामुळे थोड्या दिवसांसाठी या काळ्या बाजारावर नियंत्रण येते मात्र पुन्हा बाजार सुरु होतोच. आता तर लोकांच्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या मजबुरीचा फायदा या दलालांनी घेतल्याचे समोर आले आहे. देशातील लॉकडाऊनच्या काळात ज्या मर्यादित रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या त्यात देखील तिप्पट भावाने रेल्वे तिकिटे विकून काळा बाजार करण्यात येत होता. या संदर्भात अनेक तक्रारी दाखल झाल्यावर मध्यरेल्वेने कारवाई केली आहे. ज्यामध्ये 44 दलालांना पकडून 8 लाखांपेक्षा जास्तीची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.


22 मार्चपासून देशातील लांब पल्ल्याच्या सर्व प्रकारच्या रेल्वे सेवा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र रेल्वे बंद असल्याने अनेकांची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे देशातील काही मार्गांवर मर्यादित रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रेल्वेने 12 मेपासून 30 वातानुकूलित विशेष राजधानी गाड्या सुरु केल्या. त्यानंतर 1 जूनपासून निवडक विशेष मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या 200 सेवा सुरु करण्यात आल्या. सुरुवातीला या गाड्यांची तिकीटे केवळ स्टेशनवर उपलब्ध होती. नंतर मात्र वैयक्तिक आयडी वापरुन ई-तिकिटे काढण्याची मुभा देण्यात आली. त्यानंतर या विशेष गाड्यांमध्ये आरक्षित जागा बळकावण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. त्यासाठी वेगवेगळ्या आयडीचा वापर केला जात होता. म्हणून यात काळाबाजार होत असल्याची शंका आल्याने आरपीएफ आणि मध्य रेल्वेच्या प्रशासनाने गुप्त कारवाई सुरु केली. या कारवाईत अनेक दलाल पकडले गेले.


दलालांविरुद्धच्या या मोहिमेत मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने सायबर सेल आणि इतर यंत्रणांकडून मिळालेल्या आकडेवारीच्या आधारे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांतील वेगवेगळ्या ठिकाणी, विशेषतः खासगी ट्रॅव्हल्स एजन्सीच्या आवारात छापेमारी केली. लॉकडाऊन आणि अनलॉक कालावधी दरम्यानच्या या छाप्यांत एकूण मिळून 44 दलालांना पकडण्यात आले आणि तब्बल 8,63,191 रुपये किंमतीची 479 लाईव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली. फक्त मुंबई विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली. आतापर्यंत या लॉकडाऊन आणि अनलॉकच्या कालावधीत मध्य रेल्वेच्या आरपीएफच्या पथकाने मुंबई विभागात 22 दलाल पकडले आणि त्यांच्याकडून 6,09,298 रुपये किंमतीची 328 लाईव्ह ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याविरुद्ध रेल्वे कायद्याच्या कलम 133 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


गेल्यावर्षी आरपीएफने अशीच कारवाई करुन एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले होते. त्यात विशिष्ट सॉफ्टवेअरचा वापर करुन तिकिटांचा काळा बाजार केला जात होता. या रॅकेटची पाळेमुळे दुबईपर्यंत पोहोचली होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करुनही अजून हा काळाबाजार थांबला नाही. अजूनही अनधिकृत पणे तिकीट विकत घेऊन ती दुप्पट तिप्पट भावाने विकणे सुरु असल्याचे या घटनेवरुन सिद्ध झाले आहे.