मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या लॉकडाऊन दरम्यान विलेपार्ले भागात मुंबई पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या तरूणाला केलेल्या मारहाणीचा आरोप असलेल्या 'त्या' चारही पोलिसांची आता ओळख पटली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्यावतीनं गुरूवारी हायकोर्टात देण्यात आली.


लॉकडाऊन दरम्यान 29 मार्च रोजी राजू देवेंद्र हा 22 वर्षीय तरुण आपल्या कुटुंबियांसोबत रात्रीच्या वेळी नातेवाईकांकडे जात असताना पोलिसांनी त्याला पकडून जुहू पोलीस ठाण्यात नेले. मात्र दुसर्‍या दिवशी सकाळी पोलिसांनी राजूच्या कुटुंबियांना सांगितले की देवेंद्र जवळच्या चौकात पडला होता आणि त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर पोलिसांनी असा दावा केला की राजू देवेंद्र याने चोरी केली असल्याचा समज झाल्यानं जमावानं त्याला बेदम मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला असावा.

अशाच दुसऱ्या एका प्रकरणात दक्षिण मुंबईत 18 एप्रिल रोजी सागीर खान या मजुरावर पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र तो मजूर घरी परतल्यावर त्याने आपल्या सहकाऱ्याला या मारहाणीबद्दल सांगितले आणि तो जागीच कोसळला ज्यात त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांची दखल घेत अॅड फिरदौस इराणी यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी वांद्रे विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्यावतीनं कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. ज्यात त्या चारही पोलिसांची ओळख पटली आहे अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.

या याचिकेची दखल घेत हायकोर्टानं सविस्तर चौकशी अहवाल 6 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तसेच त्या चारही पोलिसांविरूद्ध काय कार्यवाही केली याची माहिती सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.