ठाणे : बाराव्या महिन्याच्या 12 तारखेला अर्थात 12-12 च्या मुहूर्तावर विवाह नोंदणी करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या जोडप्यांचे संगणकीय प्रणालीनेच बारा वाजवले. ठाण्याच्या गडकरी रंगायतन जवळच्या दुय्यम निबंधक कार्यालयाचा सर्व्हर बंद पडल्याचा फटका अनेक जोडपी आणि वऱ्हाडींना बसला.


या कार्यालयात 12-12 या खास दिवशी विवाह नोंदणी करण्यासाठी अनेक जोडपी आली होती. मंगळवारच्या मुहूर्तावर जवळपास 40 ते 50 जोडपी विवाहबंधनात अडकणार होती. अनेकांनी यासाठी ऑनलाईन सोपस्कारही पार पाडले होते. पण प्रत्यक्षात नोंदणी करायची वेळ आली तेव्हा सर्व्हर बंद असल्यानं ऑनलाईन नोंदणी होऊ शकली नाही.

अखेर वधू-वर आणि त्यांच्या नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केल्यामुळे कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी थेट जुन्या पद्धतीनं नोंदणी करायला सुरुवात केली. मात्र टळलेली मुहूर्ताची वेळ आणि नाहक मनस्ताप यामुळे अनेक जोडप्यांचा हिरमोड झाला.

अनेकांना दिवसभर कार्यालयातच ताटकळत उभे राहावं लागल्यामुळे त्यांची संध्याकाळच्या स्वागत समारंभाची वेळही चुकली. कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर,नवी मुंबई अशा दूरवरुन आलेल्या वऱ्हाडींनी नाराजी व्यक्त केली.