मुंबई : जागा मिळेल तिथे गाडी पार्क करुन ती तशीच सोडून देणाची सवय असणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गाडीच्या बाबतीत अशी हलगर्जी केल्यास तुमची गाडी काही दिवसातच भंगारामध्ये जमा होऊ शकते.


बेवारस गाड्या तशाच सोडून बरेच दिवस त्याचा ताबा घेण्याचीही तसदी न घेणाऱ्या मुंबईकरांना आता धडा शिकवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतला आहे.

नोटीस देऊनही दोन दिवसांत बेवारस गाडी हटवली गेली नाही, तर ती जप्त केली जाईल. जप्त केलेल्या वाहनांचा ताबा जर एक महिन्यात घेतला गेला नाही, तर अशा वाहनांचा थेट लिलाव केला जाईल. लिलावातही अशी वाहनं पडूनच राहिली, तर मात्र त्यांची भंगारात विक्री केली जाईल.

लिलाव आणि भंगार

मार्च 2017 मध्ये दोन हजार 231 वाहनांच्या लिलावातून 41 लाख 32 हजार रुपये

ऑगस्ट 2017 मध्ये दोन हजार 747 वाहनांच्या लिलावातून 95 लाख 96 हजार रुपये बीएमसीला मिळाले, तर दंडापोटी 30 लाख 96 हजार रुपये इतकी रक्कम मिळाली.

म्हणजे 2017 या वर्षातही एकूण एक कोटी 68 लाख 24 हजार इतकी रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे.

बेवारस वाहन आढळल्यास 1916 या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार करता येईल. तसंच महापालिकेच्या www.mcgm.gov.in अथवा portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर देखील तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे.