ठाणे : ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे तीन कुटुंबांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना ठाण्यात घडली आणि यावरुन हे राजकारण पेटलं आहे.


ठाण्यातील कोविड रुग्णालयात भालचंद्र गायकवाड, जनार्दन सोनवणे आणि मोरे नामक रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. मोरे यांच्यावर या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे रुग्णालयाने मोरे यांना अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले आणि ते ज्या बेडवर उपचार घेत होते, त्याच बेडवर जनार्दन सोनवणे यांना दाखल करण्यात आलं. हे करत असताना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मोरे यांचे रिपोर्ट आणि अन्य कागदपत्रे त्या बेडवरुन न हलवता केवळ मोरे यांना त्या ठिकाणाहून जनरल वॉर्डमध्ये हलवलं. त्यानंतर त्याच बेडवर जनार्दन सोनवणे यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्या दिवसांपासून सोनवणे यांच्यावर मोरे रुग्ण समजून उपचार करण्यात येत होते.


याच दरम्यान रुग्णालयात उपचार घेणाऱ्या भालचंद्र गायकवाड यांची विचारपूस त्यांचे नातेवाईक नेहमी फोनवर करत होते. यावेळी रुग्णालयाकडून त्यांना सुरुवातीला चांगला प्रतिसाद देण्यात आला. नंतर मात्र रुग्णालयाने प्रतिसाद देणं थांबवलं.


याच वेळी रुग्णालयाने सोनवणे यांच्या घरी फोन करुन तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी कळवली. सोनवणे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी दुःखातच जनार्दन सोनवणे यांचा मृतदेह असल्याचं गृहित धरुन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.


याच काळात भालचंद्र गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन आपल्या रुग्णासंदर्भात विचारपूस केली असता, तुमचा रुग्ण बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालयाने त्यांना दिली. गायकवाड कुटुंबीयांनी संपूर्ण रुग्णालयासह आजूबाजूच्या परिसरात भालचंद्र गायकवाड यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रुग्ण वयोवृद्ध असल्यामुळे स्वतः चालत जाऊ शकत नसल्याचं त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. मात्र रुग्णालयाकडून त्यांना कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता.


6 जुलै रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ठाणे शहराच्या दौऱ्यावर होते. यावेळी मेहुल गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ग्लोबल हॉस्पिटलमधून आपला रुग्ण हरवला असून हॉस्पिटल कोणताच प्रतिसाद देत नसल्याची तक्रार त्यांच्याकडे केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांना याची सखोल चौकशी करण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानंतर हे प्रकरण बाहेर आलं.


पुन्हा त्याच दिवशी रुग्णालयाने सोनवणे यांना रात्री फोन करुन तुमचा रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याची माहिती दिली. हा फोन झाल्यानंतर आपण काही दिवसांपूर्वी ज्या व्यक्तीवर जनार्दन सोनवणे म्हणून अंत्यसंस्कार केले ती व्यक्ती कोण होती असा प्रश्न सोनवणे कुटुंबियांना पडला आणि त्यांनी या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली.


या संपूर्ण प्रकरणामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला. हा सर्व प्रकार सुरु असतानाच काल रात्री पुन्हा या रुग्णालयाने मेहुल गायकवाड यांना रुग्णालयात बोलावलं. मेहुल गायकवाड यांना भालचंद्र गायकवाड म्हणून जनार्दन सोनवणे यांना दाखवण्यात आलं. यावेळी मेहुल गायकवाड यांनी हे भालचंद्र गायकवाड नसल्याचं स्पष्ट केलं. साधारण रात्री साडेनऊ वाजता जनार्दन सोनवणे यांना भालचंद्र गायकवाड म्हणून दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन तासातच जनार्दन सोनवणे मयत झाल्याची माहिती रुग्णालयाने सोनावणे कुटुंबीयांना दिली.


या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दाखल भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी घेतली असून, त्यांनी या सर्व कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच ठाणे महापालिका आयुक्तांची भेट घेऊन या रुग्णालयावर ताबडतोब कारवाई करण्याची मागणी केली.


प्रतिक्रिया


किरीट सोमय्या 
ठाण्यातील ग्लोबल हॉस्पिटलने अतिशय गलथान कारभार करत एकाचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला दिल्याचा प्रकार केलेला आहे. या प्रकारामुळे तीन कुटुंबियांना मोठा मनस्ताप सहन करावा लागलेला आहे. जिवंत असलेल्या व्यक्तीला मृत घोषित करुन दुसरा मृतदेह तिसऱ्याच्या ताब्यात देणे यावरुन या हॉस्पिटलचा कारभार आपल्या लक्षात येतो. या प्रकरणात ठाकरे सरकारने गांभीर्याने लक्ष घालून संबंधित रुग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. येत्या दोन दिवसात राज्यपालांना भेटून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.


आमदार निरंजन डावखरे 
घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्राला आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे. कुठल्याही गोष्टीचं गांभीर्य नसणाऱ्या या ग्लोबल हॉस्पिटलमधील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. आज ठाणे महापालिकेचे आयुक्त यांच्याशी आम्ही चर्चा केली. त्यांनी देखील या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन दिलेलं आहे.


अविनाश जाधव (मनसे)
या हॉस्पिटल संदर्भात यापूर्वीसुद्धा अनेक तक्रारी आलेल्या आहेत. वेळोवेळी आम्ही ठाणे महापालिका प्रशासनाकडे यासंदर्भात तक्रारी केल्या आहेत. आता प्रशासनाने या हॉस्पिटलवर ताबडतोब कारवाई करणे गरजेचे आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार याठिकाणी घडल्याची शक्यता नाकारता येणार नाही. आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येत आहे.


दिपाली सोनवणे (जनार्दन सोनवणे यांच्या पत्नी)
कोरोनामुळे माझ्या पतीचे निधन झाल्याची बातमी रुग्णालयाने दिली. एका बॅगमध्ये त्यांचा मृतदेह बंद करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रुग्णालयावर विश्वास ठेवून आम्ही त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. काही दिवसांनी पुन्हा रुग्णालयात आमचा रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असल्याचं रुग्णालयाने सांगितलं. दुसऱ्याच्या मृतदेहासमोर मला माझं कुंकू पुसण्याची दुर्दैवी वेळ आली.