मुंबई : मिशन बिगेन अगेनच्या अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांना प्रतिबंधित क्षेत्र वगळता अनेक नियम आणि अटी लागू करून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये बाजार, कपडा व्यापारी, डोमेस्टिक एअर लाइन्स, सलून व्यवसाय यांचा समावेश आहे. हॉटेल व्यवसायिक, लॉज, गेस्ट हाऊस यांना देखील परवानगी देण्यात आली आहे. मग जिम व्यवसायिकांनाचं परवानगी का देण्यात आली नाही. असा संतप्त सवाल जिम व्यवसायिकांनी उपस्थित केला आहे.

जिम व्यवसायिकांच्या म्हणण्यानुसार आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या लॉकडाऊनच्या नियमांचा अवलंब करण्यास तयार आहोत. केवळ आम्हाला आमचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्या. मागील जवळपास 4 महिन्यांपासून जीम बंद आहेत. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असणारी हजारो कुटुंब आज आर्थिक अडचणीत आहेत. जिममधे जे जिम ट्रेनरचं काम करतात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबतच व्यायाम करणाऱ्यांसाठी आवश्यक असणारे प्रोटिन्सची दुकाने देखील बंद आहेत. त्यामुळे त्या व्यवसायिकांची देखील सध्या बिकट अवस्था आहे.

जिम व्यवसायिकांच्या अडचणींबाबत बोलताना घाटकोपर येथील जिम व्यवसायिक संदीप भोज म्हणाले की, कोरोना व्हायरसचं महाराष्ट्रात वाढतं प्रमाण नक्कीच चिंतेची बाब आहे. परंतु सध्याची जिम व्यवसायिकांची परिस्थिती लक्षात घेतली तर ती खूपच हलाखीची सुरू असल्याचं लक्षात येईल. सध्या असे अनेक जिमचे मालक आहेत. ते भाडे तत्त्वावर जिमचा व्यवसाय करत आहेत. मागील साडेतीन ते चार महिन्यांपुर्वी लॉकडाऊनची घोषणा झाली आणि व्यवसायिकांवर बेकरीची कुऱ्हाड कोसळली. यातील अनेक व्यवसायिक असे आहेत जे भाडे तत्वावर जिमचा व्यवसाय चालवतात. यासाठी मासिक लाखो रुपयांचं भाडं, त्यासोबतच लाईट बील आणि जिमचे साहित्य खरेदी करताना घेतलेलं कर्ज याचा मोठ्या प्रमाणात लोड व्यवसायिकांवर आहे.


त्यामुळे शासनाने विशेष नियम लागू करून ज्या पद्धतीने सलून व्यवसायिक, बाजार, कपडे व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक  आणि डोमेस्टिक एअर लाइन्स चालवण्यास परवानगी दिली आहे. त्यापद्धतीने आम्हाला देखील द्यावी. आमचे व्यवसाय सुरू झाल्यास आम्ही आमच्याकडे येणाऱ्या नागरिकांसाठी विशेष काळजी घेणार आहोत. आम्ही एकावेळी सोशल डिस्टन्स राखून जितके लोकं घेता येतील तितकेच लोक घेणार आहोत. यासोबतच आम्ही एक बॅच बाहेर पडल्यानंतर सर्व जिम सॅनिटायझ करून त्यानंतर इतर बॅचला प्रवेश देऊ. यासोबतच मास्क, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर करू, सध्या अनेक जिम चालक कर्जबाजारी आहेत. अशा जिम चालकांना कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी. कारण हा व्यवसाय रुळावर येण्यासाठी कमीतकमी सहा महिने जाणार आहेत. सध्या जे नागरिक जिमला येतील ते तत्काळ पैसे भरणार नाहीत. कारण त्यांना आम्हाला मुदतवाढ द्यावी लागणार आहे. त्यामुळे बँकांनी आम्हांला कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी आणि त्यावर व्याज आकारू नये. याबाबत लवकरच आदित्य ठाकरे यांच्याशी भेट घेऊन आमच्या अडचणी मांडणार असल्याचं देखील संदीप भोज म्हणाले.