मुंबई : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृह परिसरात तोडफोड करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात आज मुंबईतील माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांना या घटनेला संपूर्ण सीसीटीवी फूटेज मिळाल आहे. ज्यामध्ये हल्ला करणारा व्यक्ती स्पष्ट दिसत आहे.


सीसीटीव्हीमध्ये हा व्यक्ती राजगृहच्या इमारतीतल मेन गेट मधून आत येताना दिसतो. आत आल्यानंतर हा व्यक्ती इमारतीच्या बाजुला असलेल्या गार्डन मधील 8 ते 10 मोठ्या आकाराच्या फुल झाडांच्या कुंड्या पाडून त्याची नासधूस करतो व त्यानंतर इमारतीच्या बाहेर जाऊन दोन्ही हातांमध्ये दगड आणून त्या दगडांनी इमारतीच्या खिडकिंच्या काचा फोडताना दिसत आहे. या व्यक्तीनं आपल्या डोक्यावर सफेद रंगाची प्लासिटकची पिशवी ही घातली होती.



सीसीटीव्हीत दिसणाऱ्या हल्लेखोराचं वय 25 ते 30 असल्याचा अंदाज आहे. तसच याची उंची 5.5 फुट असल्याचं दिसून येत. याप्रकरणी तक्रारदार व्यक्ती भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी नमूद केलं आहे की, राजगृह ही इमारत स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधली असून याठिकाणी त्यांचे वास्तव्य राहिले आहे. या वास्तूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मेमोरियल आणि लायब्ररी ही आजदेखील याठिकाणी आहे. अशा या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक वास्तूची पुरातत्व विभागात ऐतिहासिक वास्तू म्हणून नोंद आहे. अशा या महत्त्वपूर्ण वास्तूमधे मंगळवारी संध्याकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान एका अनोळखी व्यक्तीने राजगृहाच्या मुख्य गेट मधुन आत येतं वास्तूच्या आतील बाजूस असलेल्या 8 ते 10 मोठ्या आकाराच्या फूल झाडांच्या कुंड्यांची नासधूस केली. त्यानंतर बाहेर जाऊन दोन्ही हातात दगड आणले आणि त्याच्या सहाय्याने । वास्तूच्या काचा देखील फोडल्या.



घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी 6 तारखेला हा अज्ञात व्यक्ती राजगृहाच्या समोरच्या फुटपाथवर फिरत होता. त्यावेळी त्याला हटकले असता त्याने राग व्यक्त केला होता. हाच राग मनात धरून त्याने दुसऱ्या दिवशी मंगळवारी 7 तारखेला संध्याकाळी पाच साडेपाच वाजता खोडसाळपणे कुंड्याची आणि काचांची नासधूस केली. त्यामुळे या अज्ञात खोडसाळ व्यक्तीचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी.


महाराष्ट्रासह देशभरात या घटनेचा निषेध
दरम्यान महाराष्ट्रासह देशभरात या घटनेचा निषेध विविध संघटनांनी वेगवेगळ्या माध्यमातून केला. राज्यातील अनेक ठिकाणी काळ्या रिबन बांधून नागरिकांनी निषेध केला तर काही ठिकाणी आरोपीला शोधून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी निवेदनं देण्यात आली. तर घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी राग व्यक्त करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. राज्यातील परिस्थिती लक्षात घेतं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत आरोपीला तत्काळ अटक करून कठोर शासन करू असं आश्वासन दिलं.


डॉ. आंबेडकरांच्या राजगृहाच्या बागेत नासधूस, प्रकाश आंबेडकरांकडून शांततेचं आवाहन


याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सगळ्या आंबेडकरवाद्यांनी शांतता राखावी. पोलिसांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घातलं आहे. पोलिसांनी त्यांच कर्तव्य केलं आहे. राजगृहाच्या आजूबाजूला आंबेडकरवाद्यांनी जमू नये. पोलिस त्यांचं काम करत आहे. आपण सगळ्यांनी शांतता राखावी.

राजगृहाचे ऐतिहासिक महत्त्व
म्हणजे, दादर भागात असलेले राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी इथे दररोज भेटीला येत असतात. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे स्थान आहे.


Special Report | 'राजगृह'... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आठवणींचा साक्षीदार