ठाणे : मागील संपूर्ण आठवडा रुग्णाची संख्या ही मनात धडकी भरविणारी ठरत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीसोबतच रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. ठाण्यात रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. यासर्व गोष्टींमुळे आणि पालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याने आपण कोरोनाचे शिकार झाले आहोत काय? याची चाचपणी करण्यासाठी विविध चाचणी केंद्रावर पालिका आस्थापना आणि अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनी आज गर्दी केलेली बघायला मिळाली. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचणीचे 12 केंद्र आहेत. यातील मानपाडा, टेम्भी नाका, कळवा, वागळे इस्टेट, सावरकर नगर, लोकमान्य नगर अशा विविध केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटीजेन अशा चाचण्या करण्यासाठी गर्दी झालेली होती. 


ठाणे पालिकेच्या विविध प्रभाग समितीत कोरोनाच्या चाचण्या सुरुच होत्या. मात्र ठाणेकर चाचणीकडे दुर्लक्ष करीत होते. कोरोना चाचणी केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र दुसऱ्या कोरोनाच्या लाटेची तीव्रता वाढल्यानंतर 500 च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता दीड ते 2 हजारांवर आल्याने सर्वजण धास्तावले आहेत. दुसरीकडे पालिका आस्थापनाने चाचण्या सक्तीच्या केल्याने आणि चाचणी निगेटिव्ह असेल तरच काम मिळेल असे फर्मान काढल्याने चाचणी केंद्रावर गर्दी वाढलेली आहे. येत्या 10 एप्रिलपर्यंत चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पडसाद म्हणून गुरुवारी ठाण्यातील विविध कोरोना चाचण्या केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसले. चाचणी सक्तीची केल्याने या रांगेत अत्यावश्यक सेवेतील अस्थापना कर्मचारी यांच्यासह डिलिव्हरी बॉय, प्लांबर, एसी सारख्या गोष्टी रिपेरिंग करणारे, घर काम करणारे, किराणा मालाच्या दुकानात काम करणारे यांचा समावेश असल्याचे आढळले. यात रिक्षा आणि टॅक्सी चालक तसेच परराज्यात जाणारे काही नागरिक देखील होते. 


राज्यात गुरुवारी 56 हजार 286 रुग्णांची नोंद


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात काल (गुरुवारी) दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 8 हजार 938 रुग्ण आढळले आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :