दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यादिवशी ठाण्यातील कोरम मॉलमध्ये कार्यरत असलेल्या 27 वर्षीय दीपाली बनसोडे साचलेल्या पाण्यातून चालत घरी निघाल्या होत्या.
घर जवळच असल्यामुळे त्यांनी कंबरेभर पाण्यातून चालण्याचा धोका पत्करला. रस्त्यातून चालताना त्यांचं पतीशी फोनवर बोलणंही सुरु होतं. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क तुटला.
कोरम मॉलजवळच्या नाल्यातून वाहून गेल्यानंतर गुरुवारी दीपाली बनसोडेंचा मृतदेह कळवा-विटावा खाडीत सापडला. नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवली असून सिव्हिल रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ठाण्यातील वर्तकनगर पोलिस स्थानकात दीपाली बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.