मुंबई : मुंबईतील भेंडीबाजारमधील पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला बिल्डिंग ही पाच मजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर हे सुद्धा याच इमारतीच्या जवळ राहतात. इमारत दुर्घटनेवेळी ते घरातच होते. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला.


इक्बाल कासकर काय म्हणाले?

प्रश्न - इक्बालजी, दुर्घटना काय झाली?

इक्बाल कासकर - मी घरात होतो. नुकताच उठलो होतो. त्यावेळी स्फोटासारखा आवाज आला आणि सगळीकडे धूरळा उठला. बस्स. एवढंच पाहिलं मी. त्यानंतर खाली आलो आणि आता तुमच्यासमोर आहे.

प्रश्न - तुमच्या इमारतीलाही तडे गेलेत?

इक्बाल कासकर - हे माहित नाही. पण व्हायब्रेट झालं.

प्रश्न - ज्या इमारतीत दुर्घटना झाली, ती इमारत खूप जुनी होती का? आणि किती लोक यात राहत होते?

इक्बाल कासकर - वर कमी लोक राहत होते. मात्र खाली जे कामगार होते, ते जास्त होते.

प्रश्न - ही रहिवाशी आणि कमर्शियल अशा दोन्ही पद्धतीची इमारत होती का?

इक्बाल कासकर - हो. दोन्ही पद्धतीची होती.

पाहा व्हिडीओ :



काय आहे दुर्घटना?

मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर असलेली हुसैनीवाला बिल्डिंग ही सहामजली इमारत कोसळली आहे. मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती. मूळ तीनमजली असलेल्या इमारतीवर तीन मजले नंतर बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान ही इमारत कोसळल्याची माहिती आहे.

इमारतीत 12 खोल्या आणि सहा गोदामं असल्याचं भाजपचे स्थानिक नगरसेवक अतुल शाह यांनी सांगितलं आहे. इमारतीत 9 कुटुंब राहत होती. मात्र शंभर जण इमारतीत वास्तव्याला असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे.

इमारत पडण्यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. तळमजल्यावरील मिठाईच्या दुकानात आग लागल्याचं समजतं.