मुंबई : आगामी काळात ठाणे-भिवंडी- कल्याण मार्गावर मेट्रो रेल्वे धावण्याची शक्यता आहे. कारण एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणात या मार्गावर मेट्रोची गरज असल्याचं दिसून आलं.

 

ठाणे आणि त्यापुढील भागातला औद्योगिक पट्टा आणि वाढती लोकसंख्या पाहता, मेट्रो ठाण्याच्या पुढे नेण्याचा विचार करण्यात येत होता. ठाण्यातील कापूरबावडी ते कल्याणच्या शिवाजी चौकापर्यंत या मेट्रोचा मार्ग विचाराधीन आहे. या मार्गावर सध्या 16 स्थानक निश्चित करण्यात आली आहेत.

 

ठाण्याच्या पुढे उपलब्ध असलेल्या वाहतूक पर्यायांच्या क्षमतेवर सध्या 15 हजार अतिरिक्त प्रवाशांचा ताण येतोय. हा ताण कमी करण्यासाठी या मार्गावर नवीन मेट्रो मार्ग गरजेचा असल्याचं एमएमआरडीएने म्हटलं आहे.

 

ठाणे आणि कल्याण ही मोठी स्टेशन्स आहेत. इथे पिक-अवर्सला प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. हा ताण कमी करण्यासाठी आता मेट्रोशिवाय पर्याय नसल्याचं मत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचं आहे.

 

नोकरी/रोजगारानिमित्त मुंबईकडे ठाणे-कल्याणहून येणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. तर भिवंडीत गोदामं, लूम फॅक्टरींची संख्या अधिक असल्यामुळे तिकडे कामगारांची ये-जा असते. त्यामुळे साहजिकच वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होतो. त्यामुळे ठाणे-भिवंडी- कल्याण मार्गासाठी मेट्रो रेल्वेचा विचार सुरु आहे.

 

राज्य सरकारने कल्याणजवळच्या 27 आणि भिवंडीतील 60 गावांच्या नियोजनासाठी एमएमआरडीएची नियुक्ती केली आहे. एमएमआरडीएने डिसेंबर 2012 मध्येच या दोन्ही तालुक्याचा विकास आराखडा सादर केला. राज्य सरकारने 2015 मध्ये हा विकास आराखडा मंजुर केला.