नवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत असणार आहेत. कौशल्य विकास योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांचा हा दिल्ली दौरा असला तरी महसूलमंत्री एकनाथ खडसेंच्या प्रकरणाबाबत दिल्लीत काही खलबतं होतात का? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


 

काही दिवसांपूर्वीच अमित शाह यांनी खडसेंवरच्या आरोपांवर बोलताना, राज्य सरकारचं आरोपांची शहानिशा करेल. त्यात केंद्र सरकार हस्तक्षेप करणार नाही. असं शाह यांनी म्हटलं होतं. मात्र, तरीही मुख्यमंत्र्यांच्या या दिल्ली दौऱ्यात वरिष्ठ नेत्यांसोबत खडसेंबाबत चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं सूत्रांकडून समजतं आहे.

 

तर दुसरीकडे सलगच्या आरोपानंतर एकनाथ खडसे बंडाच्या पावित्र्यात दिसत आहेत. जळगावात खडसेंच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन सुरु केलं आहे. जळगाव जिल्ह्यातील खडसे समर्थक आमदार-खासदारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची काल भेट घेतली.

 

खासदार ए टी पाटील, आमदार स्मिता वाघ, हरिभाऊ जावळे, राजू भोळे यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा यात समावेश होता. शिवाय जळगाव महानगरपालिकेतील भाजपचे 15 नगरसेवकही आज प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडे आपला राजीनामा देतील. अशी माहिती आहे.