मुंबई : दिल्लीतून सहा दहशतवाद्यांना अटक केल्यापासून देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय झाल्या आहेत. काल रात्री मुंबई एटीएसने कारवाई करत या लिंकशी संबंधित आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. झाकीर हुसेन शेख असं या दहशतवाद्याचं नाव असून तो अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे. झाकीर हुसेन शेखने दिल्लीत अटक करण्यात आलेल्या मुंबईच्या जान मोहम्मदला हत्यार आणि विस्फोटांची डिलिव्हरी घेण्यास सांगितलं होतं.
झाकीर हुसेनची शेख अटक ही एटीएसची महत्वपूर्ण कारवाई समजली जाते. कारण दिल्लीत अटक करण्यात आलेल्या अतिरेक्यांच्या योजनेबद्दल त्याच्याकडे महत्वपूर्ण माहिती असल्याचं सांगण्यात येतंय. झाकीरने नेमकं कोणाच्या आदेशावरून जान मोहम्मदला हत्यार आणि विस्फोटांची डिलिव्हरी करण्यास सांगितलं होतं याचा खुलासा होण्याची शक्यता आहे.
जान मोहम्मदला दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर मुंबई एटीएस झाकीर हुसेन शेखच्या मागावर होते. त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी झाकीर शेख हा मुंब्रामध्ये सुरक्षित जागा शोधत होता. त्याने त्याच्या पत्नीला वांद्रे येथील एका नातेवाईकाकडे ठेवलं होतं. याची माहिती मिळताच एटीएसने सापळा रचला. झाकीरच्या पत्नीला त्याला फोन करायला सांगून त्याला एका ठिकाणी भेटायला बोलावलं आणि त्याला ताब्यात घेतलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार झाकीर हा अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. झाकीरचा भाऊ शाकीर शेख हा पाकिस्तानमध्ये असून तो अनिस इब्राहिमचा उजवा हात आहे.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या आरोपींकडून आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. भारतात हल्ला करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले ओसामा आणि जीशान बॉम्ब स्फोट घडवण्यासाठी लोकांना तयार करत होते. ज्यासाठी दोन ते अडीच किलो आरडीएक्स (RDX) त्यांनी मिळवलं होतं. तसच मुंबईतील अनीस इब्राहिमचा जवळचा हस्तगत जाम मोहम्मद शेख हा या अतिरेकींना लागणाऱ्या पैशापासून ते इतर सर्व साहित्य पोहचवत होता.
संबंधित बातम्या :