मुंबई : दोन दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली होती. या आरोपींकडून आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. भारतात हल्ला करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तयारी सुरू होती. यासाठी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आलेले ओसामा आणि जीशान बॉम्ब स्फोट घडवण्यासाठी लोकांना तयार करत होते. ज्यासाठी 2 ते अडीच किलो आरडीएक्स (RDX) त्यांनी मिळवलं होतं. तसच मुंबईतील अनीस इब्राहिमचा जवळचा हस्तगत जाम मोहम्मद शेख हा या अतिरेकींना लागणाऱ्या पैशापासून ते इतर सर्व साहित्य पोहचवत होता.
या दहशतवादी हल्ल्याची तयारी 6 महिन्यांपासून सुरू होती. मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवण्याची तयारी सुरु होती. पाकिस्तान आणि आयएसआय यासाठी दाऊदच्या गँगची मदत घेत होती. भारतामधील लोकांची निवड करुन त्यांच्याकडूनच हे स्फोट घडवून आणले जाणार होते.
जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया, ओसामा उर्फ सेमी, मुलचंद उर्फ संजू उर्फ लाला, झीशान कमर, मोहम्मद अबु बकर, मोहम्मद आमीर जावेद या सहा अतिरेक्यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. यामध्ये ओसामा आणि झीशान यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पंधरा दिवसांचं ट्रेनिंग घेतलं होतं तर मुंबईमध्ये राहणारा जान मोहम्मद शेख उर्फ समीर कालिया याचा लॉजिस्टिकसाठी वापर केला जात होता.
पाकिस्तानी लष्कराचे जब्बार आणि हमजा या दोन अधिकाऱ्यांनी ओसामा आणि झीशानसह इतर सोळा जणांना घातपाताची ट्रेनिंग दिली. तर ओसामा आणि झीशानने लोकांची नियुक्तीसुद्धा सुरू केली होती. आणि सर्वांच्या मागे होता पाकिस्तानमध्ये बसलेला त्यांचा हँडलर मुळात मुंबईतला मोहम्मद रहीमुद्दीन उर्फ बिट्टू.
मोहम्मद रहीमुद्दीन हा आधी अंडरवर्लड गँगस्टर होता जो दाऊदसाठी काम करायचा. दाऊदने त्याला आधी दुबई आणि नंतर पाकिस्तान इथं बोलावलं. पाकिस्तानमध्ये बसून बिट्टू मुंबईसह देशामध्ये अतिरेकी घातपात घडून आणण्यासाठी मुलांना अप्लाय सोबत जोडत असतो. अशी दोन मुलं होती समीर आणि झीशान, ज्यांना दिल्ली स्पेशल सेलनं अटक केली आहे.
समीर आणि झीशान यांना मुख्यकरून ब्रिज आणि रेल्वे ट्रॅक उडवण्याचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं. तसच नियुक्त करण्यात आलेल्या लोकांना ट्रेनिंग देण्याचं कामसुद्धा ओसामा आणि झीशननं सुरू केलं होतं. तर जान मोहम्मदवर स्फोट घढवण्यासाठी लागणारे पैसे, मोबाईल, सिम कार्ड, गाड्या, जे लोक या कटात सहभागी आहेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था. या सगळ्यांची जबाबदारी होती. तर जान मोहम्मद शेखला पाकिस्तानमधून मोहम्मद रहीमुद्दीन सर्व निर्देश देत होता. अनिस इब्राहिमच्या निर्देशावर जान मोहम्मद हा मोहम्मद रहिमुद्दिनकडून एका कॉलिंग ॲपद्वारे निर्देश द्यायचा.
हा सगळा कट कसा रचला जाणार होता?
- सहा महिन्यांपूर्वी हा स्फोट घडवून आणण्यासाठी तयारी सुरु झाली होती.
- यामध्ये दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेश हे मुख्य टार्गेट होते.
- अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोघांना बॉम्ब बनवण्याची जबाबदारी सोपवली होती.
- तर स्फोटासाठी लागणारे पैसे, साहित्य आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्याची जबाबदारी ही जाण मोहम्मदची होती.
- यासाठी अडीच किलो RDX आणण्यात आले होते. हे RDX नेपाळ आणि राजस्थान बॉर्डरवरून आणण्यात आलं असावं.
- RDX हे उत्तर प्रदेशमधून आणण्यात आले आणि तिथून असेम्बल करुन हे दिल्ली, मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये विभागले जाणार होते.
- उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या शहरातील मुलांची निवड करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं होतं.
- मुंबई आणि दिल्लीमध्ये सणासुदीच्या काळात तर उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांच्या काळात मोठा घातपात करण्याचा यांचा प्लान होता.
रेल्वे ट्रॅकवर स्फोट घडवण्यासाठी लांब पल्ल्यांच्या गाड्या कुठल्या याची माहिती या अतिरेक्यांकडून गोळी गोळा केली जात होती. जेणेकरून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होऊ शकेल. तर मुंबईतील अनेक महत्त्वाची ठिकाणी अटकेत असलेल्या अतिरेक्यांच्या टार्गेटवर असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. तरी जान मोहम्मद हा मुंबई, कुर्ला, धारावी, ठाणे, मुंब्रा, भिवंडी येथील काही लोकांच्या संपर्कात होता. आता ही लोकं कोण होती ते स्लिपर सेल होती का? याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले अतिरेकी तपासात सहकार्य करत नसून तपास यंत्रणांची दिशाभूल करत आहेत. ज्यामुळे त्यांना समोरासमोर बसून चौकशी केली जाऊ शकते. मात्र, इतक्या मोठ्या कटात अजून काही लोकांचा समावेश असण्याची शक्यता आहे. यांचा शोध तपास यंत्रणा करत असून येणाऱ्या दिवसांमध्ये याप्रकरणी अजून मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.