मुंबई : कोरोनाबाधित मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी वापरण्यात येणाऱ्या बॉडी बॅग्सच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याच्या आरोपांनंतर आज मुंबई महानगरपालिकेवर हे कंत्राट रद्द करण्याची नामुष्की ओढावलीय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून 250 ते 1200 रुपयांची बॉडी बॅग तब्बल 6,719 रुपयांना खरेदी केली जात असल्याचा गंभीर आरोप केला. त्यानंतर मुंबई महापलिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी कंत्राट तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र या प्रकरणात आता भाजप नेत्यांनी उडी घेतली असून या निविदा प्रक्रियेची चौकशीची मागणी केलीय.


राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा एक लाख पार गेला आहे तर एकट्या मुंबईत त्यातील 55 टक्के म्हणजेच 55,000 हून अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. यापैकी मुंबईत 2000 हून जास्त रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. अशा परिस्थितीत देशातील सर्वात श्रीमंत महानगर पालिकेवर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मृतांच्या बॉडी बॅग्सचे कंत्राट रद्द करण्याची वेळ आलीय.

काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विट करून मुंबई महानगर पालिकेने कोरोनाग्रस्त मृतांच्या बॉडी बॅग्सचे कंत्राट वेदांत इन्नोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिल्याची माहिती दिली. तसेच बाजार भावापेक्षा दहा पट चढ्या भावाने बॉडी बॅग्सची खरेदी केल्याचा धक्कादायक आरोप केला. या कंपनीचे संचालक सतीश आणि वेदांत कल्याणकर असून त्यांचा मूळ व्यवसाय मेटल कास्टिंगचा असल्याचा दावाही त्यांनी केला. सोबत मुंबई महापालिकेचे मास्क्स, ग्लोव्हज, पीपीई किट, गॉगल्स आणि फेस शिल्डच्या ऑर्डरचे दरपत्रकही जोडले. हा सर्व प्रकार घृणास्पद असल्याची प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी व्यक्त केली.


यावर कोरोनाच्या संकट काळातही मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि काही कंत्राटदार मढ्यावरचं लोणी खाण्याचं पाप करत असल्याचा आरोप करत भाजप सचिव अॅड. विवेकानंद गुप्ता यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला. तसेच वेदांत इन्नोटेकचे संचालक सतीश कल्याणकर यांनी फोनवर झालेल्या सांभाषणात 6,719 रुपये प्रति बॅग या भावाने मुंबई महापालिकेने बॉडी बॅग्स विकत घेतल्याचे मान्य केल्याचा पुरावा म्हणून ऑडिओ क्लिप असल्याचा दावा केला आहे.


मुंबई महानगरपालिकेने आरोप फेटाळले

मात्र मुंबई महानगरपालिकेने हे सर्व आरोप फेटाळले असून केंद्र शासनाच्या निकषांनुसारच 2,200 बॉडी बॅग्सची खरेदी केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच 23 मे 2020 रोजी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला तांत्रिक दृष्ट्या सक्षम संस्थांचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने निविदा प्रक्रिया रद्द करून नव्याने निविदा काढण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्याचा निर्वाळा दिला आहे. विशेष म्हणजे यासाठी महापालिकेच्या स्तरावर उत्पादनाची तांत्रिक छाननी करण्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या नेमण्यात आलेल्या पॅनल द्वारे याबाबत तंत्रशुद्ध छाननी करण्यात आली. तसेच केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर याची किंमत 7,800 एवढी असून मुंबई महापालिकेने प्रति बॅग 6,700 या दरात घेतले असल्याचं  आवर्जून निदर्शनास आणले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आता भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या टेंडर प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यामुळे मृत पावलेल्या कोरोनाग्रस्तांवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.