मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात आणि राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आलं. मात्र लॉकडाउनच्या काळात दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले होते. कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढत चाललेली संख्या आणि रेड झोन असलेल्या मुंबईत विविध आव्हानांचा सामाना करत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.


विभागाचे निकालाचे काम प्रगतीपथावर असून उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. यानंतर आता निकालाची पुढची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती मुंबई विभागीय मंडळाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.


कोरोनामुळे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल कधी लागेल याबाबत अद्याप निश्चित काहीही सांगता येत नाही. राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळापैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या आहे. लॉकडाऊनमुळे सर्वत्र बंद असल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि मॉडरेटरचे मोठे आव्हान मुंबई विभागासमोर उभे राहिले होते. मात्र राज्य सरकारच्या मदतीने आणि पोस्टाच्या सहकार्याने हे आव्हान मुंबई विभागाने पेलले आहे. जवळपास सर्वच उत्तरपत्रिका परीक्षकांपर्यंत पोहचवण्याचे आव्हान बोर्डाने पूर्ण केले आहे.


मुंबई विभागीत झालेल्या उत्तरपत्रिकेच्या सबमिशनची आकडेवारी


ठाणे 95 टक्के
पालघर 95 टक्के
रायगड 93 टक्के
मुंबई 45 टक्के


मुंबई विभागातून परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी संख्या


दहावी - 3,91,991
बारावी - 3,39,014


मुंबई विभागाने आपल्या कामाची सुरुवात पालघर जिल्ह्यांपासून करत नंतर रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराकडे वळवले. मुंबईत आणि मुंबई बाहेर अडकलेल्या तपासणीकांपर्यंत उत्तरपत्रिका पोहचवण्यासाठी त्यांच्या आपत्तकालीन पासची व्यवस्था करण्यापर्यंत सर्व व्यवस्था मुंबई विभागीय मंडळाने राज्य सरकार, शिक्षण विभाग, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस प्रशासनाच्या मदतीने पूर्ण केली. यासाठी मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरची देखील वाढ केली. ज्याचा फायदा झाल्याची माहिती मुंबई विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली. आतापर्यंत दहावीच्या आणि बारावीच्या 85 टक्के उत्तरपत्रिकांच्या सबमिशनचे काम पूर्ण झाले आहे.


'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळ उपलब्ध करण्यापासून ते खबरदारीच्या सर्व उपाययोजना राबवण्याचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर होते. मात्र राज्य मंडळाच्या मदतीने आणि मुंबई विभागाच्या कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे हे काम आम्ही करू शकलो आहे', असे संगवे यांनी सांगितले. आता मुंबईचे आवाहन लवकरच पूर्ण करायचे असून यासाठी मुंबईत येत्या 15 आणि 16 जूनला उत्तरपत्रिकांच्या सबमिशनच्या कामाला सुरुवात करणार आहोत. ज्याला परीक्षक आणि मॉडरेटरने उत्तम प्रतिसाद देण्याचे आवाहन संगवे यांनी केले आहे.


Final Year Exam | अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्या, पुण्यातील शिक्षण संस्थांची मागणी