विनायक पाटील/निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा : आयोध्या येथील प्रभू रामचंद्रांच्या मंदिर निर्माणाचं भूमीपूजन 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण असताना या विषयात शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. यामुळे समस्त रामभक्तांच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. यामुळे शरद पवार यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर राज्यभरातून 10 लाख पोस्टकार्ड 'जय श्रीराम' लिहून पाठवली जाणार आहेत. भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी या अभियानाची घोषणा करत पनवेल येथील पोस्ट ऑफिसमधून पोस्टकार्ड शरद पवार यांना धाडण्यात आली.
राम मंदिर बांधल्याने कोरोना जाणार आहे का? असं वक्तव्य शरद पवार यांनी करणे म्हणजे फारच खेदजनक आहे. याचा भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या गोष्टीचा निषेध केला आहे. समस्त प्रभू रामचंद्र भक्तांच्या भावना यानिमित्ताने तीव्र आहेत आणि म्हणूनच याविरोधात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. 'जय श्रीराम' लिहिलेली पत्र शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानी पाठवावीत, असे आवाहन भाजपाच्या कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. महाराष्ट्रभरातून तब्बल 10 लाख पत्र शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी पाठवण्यात येणार असल्याचे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सांगितले. याची सुरुवात पनवेल येथील पोस्ट कार्यालयात जाऊन करण्यात आली.
काहींना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल, राममंदिर भूमीपूजनावरुन शरद पवारांचा मोदींना टोला
रामचंद्राच्या विषयात असे नकारात्मक कुणी बोलणार असेल तर प्रभू रामाची आठवण करून देण्याचे काम नेहमीच भारतीय जनता युवा मोर्चा करत राहील. कोरोना महामारी विषयांमध्ये केंद्रातील सरकार उचित कार्यवाही करत आहे व संपूर्ण देशात योग्य दिशेने काम सुरू आहे. इतर सर्व राज्यही चांगले काम करत आहेत. परंतु या बाबतीत महाराष्ट्रात मात्र कुठेही सुसूत्रता दिसत नाही. महाराष्ट्र आज कोरोनामध्ये नंबर वन झालेला आहे. आघाडी सरकारमधील तीनही पक्षात बिलकुल समन्वय दिसत नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता भरडली जात आहे, त्यामुळे राम मंदिर बांधल्याने कोरोना जात नाही. तर मग ज्यामुळे करोना जातो अशा किमान चार गोष्टी शरद पवार यांनी महाराष्ट्रातील आघाडी सरकारला शिकवाव्यात म्हणजे महाराष्ट्रातील जनतेचे कल्याण होईल, असं आवाहन भाजपा युवा मोर्चा कडून करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
- Ram Mandir | ठरलं!, अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन
- राम मंदिराच्या कामाचा मुहूर्त ठरला, असं असेल राममंदिर!
Sharad Pawar on Ram Mandir | काही लोकांना वाटतं मंदिर बांधून कोरोना जाईल,पवारांचा पंतप्रधानांना टोला