रायगड : स्वराज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगड परिसरातील छत्र निजामपूर ग्रामपंचायतीच्या नावाचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला आहे. सत्ताधारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी हा मुद्दा उपस्थित केला आहे. निजामाच्या खुणा पवित्र रायगडची (Raigad Fort) ओळख सांगत असतील तर ते आपले दुर्दैव आहे असं ते म्हणाले. पडळकरांनी या नामांतरावरून अनेक मुद्दे उपस्थित केले. किल्ले रायगड ज्या ग्रामपंचायतमध्ये येतो त्या छत्र निजामपूर या ग्रामपंचायतीचे नाव 'रायगड वाडी' करा अशी मागणी पडळकर यांनी केली.
राज्यात भाजप सरकार आल्यानंतर अनेक गावांचे आणि ठिकाणांच्या नामांतराची मागणी होऊ लागली. औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर, अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करण्यात आलं. त्यानंतर आता किल्ले रायगड जिल्ह्याच्या ग्रामपंचायतीचे देखील नामांतर करा अशी मागणी पडळकर यांनी केली आहे.
Chhatri Nizampur Gram Panchayat : छत्र निजामपूरचे नाव बदला
आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, "रायगड किल्ला हा अखंड हिंदुस्तानातल्या लोकांसाठी उर्जास्थान आहे. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वर्षे वास्तव्य केलं. असं असतानाही हा किल्ला ज्या ग्रामपंचायतीमध्ये येतो त्या ग्रामपंचायतीचं नाव हे छत्र निजामपूर असं आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये लहान अशा 12 वाड्या आहेत. असं असतानाही याच नाव हे निजामपूर कसं? निजामाच्या खुणा या इथं कशा काय आल्या? आदिलशाह, निजामशाह, मुघलाच्या सर्व खुणा या पुसल्या पाहिजेत. रायगड ही ग्रामपंचायत निजामपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत असेल तर आम्हाला मान्य नाही. त्यामुळे या ग्रामपंचायतीचं नाव बदलून रायगड वाडी असं करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे."
नामांतरावरुन राजकारण नको, ग्रामस्थांची मागणी
छत्र निजामपूरचे नाव बदलून त्याचे नाव रायगड वाडी असं करण्याची मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. स्थानिक गावकऱ्यांनी सुद्धा पडळकर यांच्या भूमिकेची पाठराखण केली. रायगडवाडी हे नाव झालं तर आनंदाची गोष्ट आहे, मात्र हे करत असताना यामध्ये कुठे राजकारण करू नये अशी कानउघडणी देखील काही स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदाराची भूमिका जरी नामांतराची असली तरी या त्यावर सरकार काय पाऊल उचलतं हे पाहावं लागेल.
ही बातमी वाचा: