अयोध्या: देशाच्या राजकारणात गेली तीन दशके वादळ निर्माण करणाऱ्या राम मंदिर निर्मितीची प्रत्यक्ष अंमलबजावणी होताना दिसते आहे.  उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहतील.


अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरलाय. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे...देशाच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. काल मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आलीय. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांंनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय कोर्टाकडे होता. आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसतील.

कोरोनाच्या काळात फार गर्दी होऊ नये यासाठीही खबरदारी घेण्यात येतेय. अगदी 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्याचं नियोजन आहे. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते हे देखील पाहणं महत्वाचं असेल. हे मंदिर कशा पद्धतीनं बांधलं जाणार याचीही उत्सुकता आहे. कालच्या ट्रस्टच्या बैठकीत त्यावरही चर्चा करण्यात आली.

असं असेल नवं राम मंदिर

गर्भगृहापासून शिखराची उंची ही 138 फूटाऐवजी 161 फूट इतकी असणार आहे. आधीच्या मॉडेलमध्ये 2 च घुमटांची रचना होती, त्याऐवजी आता पाच घुमट करण्यात येणार आहेत. जमिनीत 60 मीटर खोलवर खोदकाम करुन पाया भक्कम करण्यात येणार आहे. येत्या 3 महिन्यांमध्ये ट्रस्ट निर्माण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या राम मंदिर ट्रस्टमध्ये सहापेक्षा अधिक सदस्य असू शकतात. मंदिरासाठी उत्तर प्रदेश सरकारचं 500 कोटींचं बजेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राम मंदिराच्या 8 किलोमीटरच्या परिघात धर्मशाळा, हॉटेल बांधण्यास परवानगी नसेल.

पाच ऑगस्ट या तारखेचं आणखी एक महत्व म्हणजे मागच्या वर्षी याच दिवशी कलम 370 रद्द करण्याचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ आणखी एक महत्वाचा, प्रलंबित विषय याच दिवशी मोदी सरकार मार्गी लावतंय.

सुप्रीम कोर्टानं मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राम मंदिराबाबत ऐतिहासिक निकाल दिला. सुप्रीम कोर्टानं मंदिर निर्मितीसाठी 3 महिन्यांत ट्रस्ट उभारण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार फेब्रुवारीमध्ये या ट्रस्टची स्थापना झाली. नंतर रामनवमीचा एखादा मुहूर्त शोधून काम सुरु करण्याचा समितीचा मानस होता. मात्र कोरोना संकटामुळे हा संकल्प लांबणीवर पडला.

या मंदिराचं काम साधारण तीन ते साडेतीन वर्षात पूर्ण होऊ शकतं असा अंदाज आहे. अमित शाहांनी तर झारखंडच्या प्रचारात यापेक्षाही वेगवान म्हणजे सहा महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची गर्जना केली होती. ते कधी पूर्ण होतं हे कळेलच. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकांआधी ते पूर्ण व्हावं हाच भाजपचा प्रयत्न असेल.


Ayodhya Ram Mandir | कसं असेल अयोध्येच्या नवीन राम मंदिराचं स्वरुप?


भूमिपूजन 5 ऑगस्टलाच का?-  पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण

राम मंदिर निर्माणाचे भूमिपूजन 5 ऑगस्टला करण्यात येणार आहे. संपूर्ण भारताचे का दिवसाकडे लक्ष लागले आहे. मात्र त्यासाठी 5 ऑगस्ट हाच दिवस का निश्चित करण्यात आला. त्याला देखील कारण आहे. वास्तुशास्त्रानुसार हा शुभ मुहूर्त असल्याचे पंचांग अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे. तसेच या दिवसाला पौराणिक आणि आधुनिक भारताच्या इतिहासात देखील महत्व आहे. राम मंदिर निर्माण हा एक सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या महत्वाचा विषय असल्याचे सोमण म्हणाले.