मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर कालपासून (17 जानेवारी) पहिली खासगी तेजस एक्स्प्रेस धावू लागली आहे. मुंबई-अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या या रेल्वेमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या रेल्वे सुंदरी (Train Hostess) आणि त्यांच्या पोशाखावरून वाद निर्माण झाला होता. हा पोशाख केवळ गुजराती काठवाडी पद्धतीचाच असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यास विरोध केला होता. होस्टेसचा पोशाख महाराष्ट्रीय पद्धतीचादेखील असावा अशी मागणी मनसेने केली होती. हा वाद अधिक वाढून नये म्हणून रेल्वेने माघार घेतली आहे.


तेजस एक्स्प्रेस जेव्हा मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली तेव्हा होस्टेसच्या पोशाखात लगेच बदल करण्यात आला. या तरुणींच्या डोक्यावरील काठवाडी टोप्या बदलून त्याठिकाणी गांधी टोपी दिली गेली. ही टोपी महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे हा पोशाखाचा वाद आता मिटण्याची शक्यता आहे.


तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी संस्कृतीकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेकांनी तेजसला विरोध केला होता. मात्र, मुंबई सेंट्रल येथे तेजस एक्स्प्रेस दाखल झाल्यावर होस्टेसनी गांधी टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच 'जय महाराष्ट्र'चा घोष करत त्यांनी मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांचे स्वागत केले.


दिल्ली ते लखनऊ पहिल्या खासगी एक्स्प्रेसनंतर अहमदाबाद ते मुंबई दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस शुक्रवारी धावली. ही गाडी अहमदाबादहून सकाळी 10.30 वाजता सुमारास सुटली. त्यानंतर, संध्याकाळी 5 च्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचली.


गरबा, दांडियाचा जल्लोष करून अहमदाबादहून एक्स्प्रेस सुटली. मात्र, मराठी संस्कृती आणि भाषेचा उल्लेख नसल्याने मराठीप्रेमी तेजस एक्स्प्रेस मुंबई सेंट्रलवर येऊ देणार नव्हते, पण आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मराठी पेहराव म्हणून होस्टेस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना गांधी टोप्या दिल्या.


तेजसमध्ये गुजरातीसोबत महाराष्ट्रीय पदार्थांची मेजवानी
तेजस एक्स्प्रेसमध्ये कोंबडीचा झणझणीत रस्सा, कोकणी पद्धतीचे चिकन, चिकन कोल्हापुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, बटाटा वडा, बाकरवडी, कोथिंबीर वडी, कांदेपोहे अशा अस्सल महाराष्ट्रीय मांसाहारी व शाकाहारी खाद्यपदार्थाची मेजवानी मिळणार आहे.


पहिल्याच दिवशी तेजस एक्स्प्रेसमध्ये छोटा अपघात
तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवास सुरु असतानाच एक छोटा अपघात झाला. ट्यूबलाईट वर लावलेले प्लास्टिकचे पॅनल अचानक खाली कोसळले. त्यामुळे कोणाला इजा झाली नाही मात्र ही गाडी जुनी असल्याचे सिद्ध झाले. गाडीवर दिलेल्या माहितीप्रमाणे ही गाडी ऑगस्ट 2018 मध्ये बनवण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत ती तशीच उभी ठेवली होती का? असा प्रश्नही याठिकाणी निर्माण होतो.


मराठीकडे अजूनही दूर्लक्षच
तेजस एक्सप्रेसमधील पाट्यांवर इंग्रजी, हिंदी आणि गुजराती भाषेत सूचना लिहिण्यात आल्या आहेत. मात्र त्यामध्ये मराठीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मराठीप्रेमी रेल्वे व्यवस्थापनावर नाराज आहेत.