मुंबई : मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांच्या टीमने कार्बन डायऑक्साईड नियंत्रणावर एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामध्ये औद्योगिक उत्सर्जनातून बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्सईडचे रूपांतरण व्यवसायिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्व असणाऱ्या रसायनांमध्ये करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांच्या टीमला तब्बल 85 लाखांचे बक्षीस मिळाले आहे. 


एक्स्प्राईज कार्बन रिमूव्हल आणि ईलॉन मस्क फाउंडेशन यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक स्पर्धेमधील विजेत्या असलेल्या 23 टीममध्ये आयआयटी मुंबईच्या या टीमचा सहभाग आहे. या टीममध्ये आयआयटी मुंबईतील श्रुती भामरे, श्रीनाथ ऐय्यर, अन्वेशा बॅनर्जी आणि शुभम कुमार या चार विद्यार्थ्यांचा समावेश असून प्राध्यापक अर्णब दत्त आणि प्राध्यापक विक्रम विशाल यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


पृथ्वीच्या सततच्या वाढत्या तापमानवाढीमुळे वातावरणात होणाऱ्या बदलांवर विचार करणे गरजेचे आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाहनांचा वाढत वापर, शेतीमध्ये वापरला जाणारा रसायनांचा मोठ्या प्रमाणावरील वापर, विविध इंधनांचे ज्वलन यामुळे पृथ्वीवरील नैसर्गिक कार्बन प्रमाण असंतुलित होत आहे. तापमान वाढीसाठी कार्बन डायऑक्सईडची मोठ्या प्रमाणावरील उत्सर्जन हे मुख्य कारण आहे. त्यामुळे कार्बन डायऑक्साइड ला नियंत्रणात आणणे ही काळाची गरज आहे.


या तंत्रज्ञान निर्मितीनंतर, कार्बन उत्सर्जनानंतर त्याच्यामधून विविध रसायनांच्या निर्मितीसाठी जे व्यापक वापरासाठी उपयुक्त असतील, स्वस्त, किफायतशीर असतील आणि भरपूर काळ टिकणारी शाश्वत असतील अशा उत्पादन निर्मितीमध्ये भारत महत्त्वाची भूमिका जगात बजावू शकेल अशी प्रतिक्रिया शुभम कुमार या विद्यार्थ्याने दिली. दरम्यान, उत्सर्जन कमी करून तापमान वाढीची समस्या कमी होणार नसून त्या कार्बन डायऑक्सईडला नियंत्रित करणे किंवा त्याचा नाश करून इतर निर्मितीला प्राधान्य देणे हे महत्त्वाचे ठरणार सल्ल्याची प्रतिक्रिया प्राध्यापक विक्रम विशाल यांनी दिली. दरम्यान, या स्पर्धेत या चमूची आता निवड झाली आहे. त्यांना आता त्यांनी मांडलेल्या संकल्पनेचा प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवायचा आहे. हे झाल्यानंतर त्यांना अंतिम बक्षीस मिळणार आहे.


आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या तंत्रज्ञान ही दोन टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. पहिल्या टप्प्यांत उद्योगांतून वायुरूपात असलेल्या कार्बन डायऑक्सईडला वेगळे करणे आणि दुसऱ्या टप्प्यांत त्याचे महत्त्वाच्या रसायनांमध्ये रूपांतरण करणे याचा समावेश आहे. हा पुरस्कार जिंकणारी देशातील आयआयटी मुंबई ही ही एकमेव संस्था ठरली आहे. हे पुरस्कार वातावरण, समुद्र आदी पर्यावरण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या तरुणांना देण्याचे ठरविण्यात आले होते. 


महत्त्वाच्या बातम्या :