मुंबई : नवी मुंबईमधील 500 चौरस फुटांपर्यंत घरे असलेल्या रहिवाशांना दिलासा देण्याचा निर्णय महापालिकेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण प्रांपर्टी टॅक्स माफ करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. हा प्रस्ताव येणाऱ्या महासभेत मंजूर करण्यात येणार आहे.


नवी मुंबई शहरात बहुसंख्य रहिवासी हे आर्थिक दुर्बल आणि मध्यमवर्गीय असल्याने या करमाफीचा 80 टक्के रहिवाशांना फायदा होणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयावर भारतीय जनता पक्षाने टीका केली आहे. करमाफीवरुन महापालिकेतलं राजकारण चांगलंच तापलं आहे.

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस लोकांची दिशाभूल करीत आहे. निवडणुकीपूर्वी करमाफीच्या या प्रस्तावाला मंजुरीच मिळू शकत नाही, असेदेखील म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने चार महिन्यापूर्वी हा निर्णय का घेतला नाही? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी माजी मंत्री गणेश नाईक यांना विचारला आहे.