मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास दोन आठवड्यांत संपवणार आहोत, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई क्राईम ब्रॅन्चने गुरुवारी हायकोर्टाला दिली. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन रद्द केल्याच्या निर्णयाला आरोपी डॉक्टरांकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती साधना जाधव यांनी ही याचिका दाखल करुन घेतली आहे. 16 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी तक्रारदार या नात्याने पायलची आई आणि इतर प्रतिवादींना त्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी हायकोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली आहे.


दरम्यान, तपासयंत्रणेने स्वत:हून या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिलला द्यायला हवी होती. कोर्टाच्या निर्देशांची वाट का पाहता? असा सवाल हायकोर्टाने सरकारी वकिलांना केला. रॅगिंग आणि आत्महत्येचे हे प्रकरण आहे, त्यामुळे हॉस्पिटलकडून निलंबन आणि कायदेशीर कारवाई होत असताना मेडिकल काऊन्सिलची भूमिकाही स्पष्ट होणे गरजेचे आहे, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. तर दुसरीकडे आरोपी अजूनही तपासात सहकार्य करत नसल्याचे हायकोर्टाला सांगत पोलिसांनी काही महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर केले. यावर केवळ मोबाईलमधील साहित्य पुरेसे नाही, ते फॉरेन्सिक तसेच हँडरायटिंग एक्सपर्टकडूनही तपासून घ्या, असे निर्देशही तपासयंत्रणेला देण्यात आले आहेत.

डॉ. पायल तडवीने 22 मे रोजी नायर रुग्णालयाच्या वसतीगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केली, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांनी 23 मे रोजी गुन्हा नोंदवून नायर हॉस्पिटलमधील तिच्या तीन सहकारी महिला डॉक्टरांना अटक केली आहे. यामध्ये डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खांडेलवाल यांचा समावेश आहे. आग्रीपाडा पोलिसांनी तिन्ही डॉक्‍टरांवर रॅगिंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.