नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेचे निलंबित कर संकलन अधिकारी प्रकाश कुलकर्णी यांच्यावर आज एनआरआय पोलीस गुन्हा दाखल आला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हा गुन्हा दाखल केला केला आहे. 681 कोटींच्या अफरातफरीचा प्रकाश कुलकर्णी यांच्यावर आरोप आहे.


मालमत्ताकरांच्या बिलामध्ये अफरातफर करुन महापालिकेच्या 681 कोटी रुपयांचं नुकसान करणे, कागदपत्रांमध्ये फेरफार करुन मालमत्ताधारकाला फायदा करून दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश कुलकर्णी यांच्यासह लेखापाल दिनेश गवारी आणि संगणक ऑपरेटर किशोर धाले यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच प्रकाश कुलकर्णी यांनी झाडाझडती करत त्याना निलंबित केल होतं. यानंतर कुलकर्णी यांच्यावर ठाणे येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही दाखल केली होती.

यानुसार कुलकर्णी यांच्या वाशी येथील घरावर छापाही मारला. त्यात मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारावर आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यामुळे आता कुलकर्णी यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे तुकाराम मुंढे यांच्या रडारवर असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये आता चांगलीच खळबळ माजली आहे.