महिला सुरक्षेसाठी रेल्वेची पावलं, टॉकबॅकने थेट गार्डशी संपर्क
एबीपी माझा वेब टीम | 22 Dec 2016 07:58 AM (IST)

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेने काही महिन्यांपूर्वी आखलेला आराखडा अखेर प्रत्यक्षात उतरणार आहे. मेट्रो ट्रेनच्या धर्तीवरील आता उपनगरी लोकल ट्रेनमध्येही 'टॉकबॅक' प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीद्वारे महिला प्रवाशांना संकटकाळी गार्डशी संपर्क साधता येणार आहे. त्यामुळे महिलांना तातडीने मदत मिळू शकेल. प्रायोगिक तत्त्वावर दोन लोकल ट्रेनमध्ये 'टॉकबॅक' प्रणाली बसवण्यात येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत पश्चिम रेल्वेच्या दोन लोकल गाड्यांतील महिलांच्या प्रत्येकी तीन डब्यांमध्ये ही प्रणाली बसवली जाईल. त्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या महालक्ष्मी कारशेडमध्ये ही प्रणाली बसवण्याचे काम सुरु आहे. कशी असेल टॉकबॅक प्रणाली? महिलांच्या डब्यात दरवाजाजवळ मायक्रोफोन बसवण्यात येणार आहे. त्यावरील बटण दाबताच तात्काळ गार्डशी संवाद साधता येईल. या यंत्रणेतून महिला प्रवासी आणि गार्डना वॉकी-टॉकीप्रमाणे थेट बोलता येईल. हा प्रयोग यशस्वी ठरल्यानंतर इतर लोकलमध्येही तिचा समावेश केला जाणार आहे.