मुंबई : अरबी समुद्रातील शिवस्मारकाला कोळी बांधवांचा विरोध कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 24 तारखेला शिवस्मारकाचं भूमीपूजन आहे. मात्र पंतप्रधान मोदींसमोर आंदोलन करण्याचा इशारा मच्छिमार संघटनांनी दिलाय.

मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटीच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कालची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा एकदा बैठक पार पडणार होती. मात्र अजून याबाबत निमंत्रण न आल्याने मच्छिमार संघटना आक्रमक झाल्या आहेत.

शिवस्मारकाच्या जागेला मच्छिमारांचा विरोध का?

शिवस्मारकाची जी जागा आहे, त्या खडकावर 32 प्रजाती प्रजनन करतात. ज्या या प्रकल्पामुळे नष्ट होतील. मोसम असल्यावर 100 ते 150 किलो मासे एकट्या नाखवाच्या गळाला लागतात. एकूण 150 ते 200 बोटी आहेत. त्यामुळे महिन्याला लाखो रुपये उत्पन्न मिळतं. मात्र शिवस्मारकामुळे मोठं नुकसान होऊन तुटपुंज्या पगारावर प्रकल्पात रोजगार करावा लागेल, याला मच्छिमार संघटनांचा विरोध आहे.

आधीच सुरक्षेच्या कारणावरून राजभवनालगत मच्छिमारी करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 26/11 हल्ल्यातील दहशवाद्यांनी याच बंदरावरून प्रवेश केला होता. त्यामुळे सुरक्षेसाठी अनेक निर्बंध लादले गेलेत. शिवस्मारकामुळे यात जास्त भर पडेल, अशी मच्छिमारांना भीती आहे.

शिवस्मारक आणि राजभवणामुळे मच्छिमारांचा नैसर्गिक मार्ग बंद होईल. मच्छिमारांना हवेचा अंदाज घेऊन बोटींचा मार्ग ठरवावा लागतो. मात्र या प्रकल्पानंतर त्यांना समुद्राला वळसा घालण्याशिवाय पर्याय नाही, असं मच्छिमारांचं म्हणणं आहे.

छोटे मासे नष्ट झाल्याने त्यांच्या शोधात येणारे मोठे मासेही या भागात दुर्मिळ होतील. तिवरांची झाडं नष्ट झाल्याने जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होईल, ज्याचा फटका पुन्हा मच्छिमारांच्या व्यवसायावर पडेल, असं मच्छिमार संघटनांचं म्हणणं आहे.