विरार ते डहाणूपर्यंतच्या केलेल्या सर्वेक्षणात विरार, पालघर, वैतरणा स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास हा उभ्यानेच होत असल्याचे निदर्शनास आले. लोकलसाठी स्थानकांत होणाऱ्या गर्दीसोबतच काही असामाजिक घटकांकडून दिला जाणारा त्रासही जास्त असल्याचे मत यातील अनेक महिलांनी व्यक्त केले आहे. जवळपास 45 टक्के महिलांनी विरार ते डहाणूदरम्यानच्या प्रवासात छळ आणि त्रास होत असल्याचे सांगितले. यातील केवळ एक चर्तुथांश महिला रेल्वे पोलिसात तक्रार करण्यासाठी पुढे येतात. काही महिला या सुरक्षा हेल्पलाइनची मदत घेऊन आपली समस्या सोडवतात. अनेक महिला प्रवाशांना रेल्वे स्थानकात प्रवेश करताना अनधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, फेरीवाले यांच्यामुळेदेखील त्रास सहन करावा लागतो.
हीच परिस्थिती मध्य रेल्वेवरील नेरळ ते कर्जतदरम्यान प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांचीही आहे. कर्जत स्थानक हे गर्दीचे स्थानक झाले आहे. येथून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांनी गर्दीच्या वेळी लोकल डब्यात आसनव्यवस्था उपलब्ध होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे उभ्यानेच प्रवास करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे सरासरी 10 पैकी 4 महिला प्रवाशांना प्रवासादरम्यान काही असामाजिक घटकांकडून छळवणूक व अन्य त्रास सहन करावा लागत आहे. यातील 60 टक्के महिला रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करतात. तर 13 टक्के महिला हेल्पलाइनचा आधार घेतात. महिलांसाठीच्या डब्यांमध्ये महिला पोलीस कर्मचारी असाव्यात, अशी मागणी महिलांकडून होऊ लागली आहे.
व्हिडीओ पाहा