मुंबई : सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज (07 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना अज्ञातस्थळी नेलं जाणार आहे. एकही आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने हा खबरदारीचा उपाय योजला आहे.


उद्या (08 नोव्हेंबर) रात्री 12 वाजता सध्याची विधानसभा विसर्जित होईल. त्याअगोदर बहुमत मिळालेल्या पक्षाने (युतीने किंवा आघाडीने) सत्तास्थापनेचा दावा करुन मंत्रीपदांची शपथ घेणे गरजेचे आहे.


दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासह काही प्रमुख नेत्यांचे एक शिष्टमंडळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. भाजपला राज्यात सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजप आजच सत्तास्थापनेचा दावा करेल, असे भाकित वर्तवण्यात येत आहे.


भारतीय जनता पक्षाला सत्तास्थापन करायची असेल, तर त्यांच्याकडे 145 आमदारांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. भाजपकडे आत्ता 115 ते 117 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्याचे प्रयत्न होतील, याची शिवसेनेला भिती आहे. त्यामुळेच शिवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांना अज्ञातस्थळी ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी सर्व पक्षांचे आमदार फोडण्याचा गेल्या काही दिवसात प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यासाठी भाजपने गुंडांचा, धमक्यांचा वापर केल्याचेदेखील राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेने सावध पवित्रा घेतला आहे.


काल वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत सत्तास्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या रणनितीसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानंतरच आजची राज्यपाल भेट ठरवण्यात आली आहे.


व्हिडीओ पाहा