मुंबई : राज्यात बिगर भाजप सरकार येणं ही काँग्रेसजनांची इच्छा असल्याचं मोठं वक्तव्य काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलं आहे. तसेच यासंदर्भात शिवसेनेने भूमिका घ्यावी असं आवाहनही चव्हाण यांनी केलं आहे. जनतेने कौल काही भाजपच्या बाजूने दिलेला नाही, त्यामुळे भाजपचं सरकार राज्यात येता कामा नये हा प्रमुख निष्कर्ष आहे. यासाठीचे सर्व पर्याय आम्ही चर्चा करुनचं निर्णय घेऊ असंही चव्हाण म्हणाले. पण प्रथम निर्णय शिवसेना काय घेते हा महत्त्वाचा विषय आहे. शेवटी शिवसेनेने निर्णय घेतल्यानंतरचं राज्यामध्ये सत्ता परिवर्तन होईल. त्यामुळे बिगर भाजप सरकार येणं हे आमचं प्राधान्य राहणार असल्याचं चव्हाण म्हणाले.


अशोक चव्हाणांच्या विधानाचा धागा पकडत काँग्रेसमधील आमदारांचा एक गट शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवत, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचंही काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

Ashok Chavan | बिगर भाजप सरकार बनणं ही काँग्रेसजनांची इच्छा : अशोक चव्हाण | ABP Majha



दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ देणार नाही, ही आमची (काँग्रेस) आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे. असे वक्तव्य काँग्रेस नेते आणि राज्यसभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी केले आहे. हुसेन दलवाई यांनी आज नुकतेच शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या कार्यालयात जाऊन शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये 15 मिनिटे चर्चा झाली. या चर्चेनंतर दलवाई यांनी भाजपचं सरकार येणार नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे या दोघांमध्ये बंद दाराआड काय चर्चा झाली, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट

शिवसेनेला पाठिंबा देण्यावरुन काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, संजय निरुपम यांच्यासह काही ज्येष्ट नेत्यांनी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, अशी भूमिका मांडली आहेत. तर हुसेन दलवाई, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजीत कदम यांच्यासह पक्षातील तरुण नेते हे शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अनुकूल आहेत.

Husain Dalwai | भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा द्यायला हवा : हुसेन दलवाई | ABP Majha