मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) पवार विरूद्ध पवार हा जंगी सामना महाराष्ट्रात रंगणार आहे.  कर्जतमध्ये अजित पवारांनी ही गर्जना केलीय. लोकशाहीत सर्वांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे.  जनता ठरवेल कोण जिंकणार, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे. देवगिरी बंगल्यावरील बैठकीला सुप्रिया सुळेंनाही (Supriya Sule) बोलावल्याचा दावा अजित पवारांनी (Ajit Pawar) केला. हा दावा सुप्रिया सुळेंनी फेटाळला आहे. देवगिरीतल्या बैठकीला मला बोलावलं नव्हतं, बैठक मी गेटक्रॅश केली, अशी माहिती शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एबीपी माझाशी बोलताना दिली.  


सुप्रिया सुळे म्हणाल्या, लोकशाहीत सर्वानाच कुठूनही निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. मी लोकशाहीवर प्रेम करणारी विश्वास ठेवणारी नागरिक आहे.  एखाद्या पक्षाने कुठून निवडणूक लढवावी हा लोकशाही अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे.मी त्यांच्या निर्णयाचं मनापासून स्वागत करते


ही  वैयक्तिक नाही तर वैचारिक लढाई


मी लोकशाहीवर प्रेम करणारी विश्वास ठेवणारी नागरिक आहे. एखाद्या पक्षाने कुठून निवडणूक लढवावी हा लोकशाही अंतर्गत त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांच्या निर्णयाचे मनापासून स्वागत करते. आमची नाती आणि आमचं प्रोफेशन वेगवेगळे आहेत. लोकशाहीत कुणीतरी कुणाच्या विरोधात लढणार आहे. ही  वैयक्तिक लढाई नाही, वैचारिक लढाई आहे. जनता ठरवेलच कोण जिंकणार मी याला लढाई समजत नाही. मी लोकप्रतिनिधी आहे, लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी आले आहे. लोकसेवा हा आपला विषय असेल तर त्यात लढाई कसली, असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या. 


मी देवगिरीवरील बैठकीला गेले नव्हते 


मी देवगिरीवरील बैठकीला बोलावून गेली नव्हती तर गेटक्रॅश करून मी गेली होती. मी तिथे असताना त्यांनी मला विचारलं म्हणून मी म्हटलं की मला सात दिवस द्या, मी बाबांसोबत बोलते. माझ्या पोटात अनेक गोष्टी असतात, ज्या मी सार्वजनिक पद्धतीने सांगत नाही. सगळ्याच गोष्टी बाहेर साांगायच्या नसतात, मी त्याबद्दल पुस्तक वगैरे पण लिहीणार नाही, असे देखील सुप्रीया सुळे म्हणाल्या.


पवार विरुद्ध पवार सामना


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत आपला पक्ष बारामती , शिरूर , सातारा आणि रायगड मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल असं म्हटलंय . पक्षाच्या कर्जतमध्ये सुरु असलेल्या दोन दिवसीय शिबिरात बोलताना अजित पवारांनी ही घोषणा केलीय . या  चारपैकी तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाची लढत शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध होण्याची शक्यताय . मात्र सगळ्यांचं लक्ष असेल ते  बारामतीमध्ये बहीण सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध अजित पवार आपल्या कुटुंबातील कोणाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतात का याकडे.  अजित पवारांच्या या घोषणेनंतर महाराष्ट्रात याआधी कधीही न झालेला पवार विरुद्ध पवार हा सामना रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय.