मुंबई : शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या 82 वर्षीय आरोपी आणि ज्येष्ठ तेलुगु कवी वरवरा राव (Varavara Rao) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. वैद्यकीय कारणास्तव त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या दरम्यान वरवरा राव यांना मुंबईबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे, तसेच या प्रकरणातील इतर आरोपींशी संपर्क साधण्यास मनाई घालण्यात आली आहे. 


भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आणि शहरी नक्षलवाद प्रकरणी वरवरा राव यांना अटक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आज दिलासा देताना जामीन मंजूर केला आहे. पण यावेळी त्यांच्यासमोर काही अटीशर्थी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वरवरा राव यांना मुंबई सोडता येणार नाही, तसेच या प्रकरणातील इतर आरोपींशी संपर्क साधण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे. 


त्यांना जामीन फक्त आणि फक्त वैद्यकीय कारणांसाठीच देण्यात आला असून राव त्यांच्या मर्जीच्या ठिकाणी उपचार घेऊ शकतात असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. मात्र त्याची माहिती एनआयएला देणं बंधनकारक असल्याचंही न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. 


शहरी नक्षलवाद प्रकरणी या आधी सुधा भारद्वाज यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र त्यावेळी अन्य आठ आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला होता. वरवरा राव तुरुंगात असताना त्यांचा पार्किन्सनचा आजार बळावला होता. त्यांना हर्निया झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना मोतीबिंदू झाला असून त्यावरही शस्त्रक्रिया करणं आवश्यक आहे असं त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं होतं. 


काय आहे प्रकरण? 
पुण्यात 31 डिसेंबर 2017 रोजी झालेल्या एल्गार परिषदेनंतर 1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगावामध्ये हिंसाचाराचा प्रकार घडला. त्यानंतर एल्गार परिषदेतील सहभागामुळेच वरवरा राव यांच्यासह काहींना पुणे पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा तपास सुरूवातीला पुणे पोलीस तपास करत होते. पुणे पोलिसांनी फेब्रुवारी 2019 मध्ये या प्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यानंतर जानेवारी 2020 मध्ये राष्ट्रीय तपास एजन्सी (एनआयए) कडे हा तपास हस्तांतरित करण्यात आला. 


महत्त्वाच्या बातम्या: