Sanjay Raut : पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl Case) ईडीच्या (ED) चौकशीनंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली आहे. आज संजय राऊत यांना भेटण्यासाठी एक खासदार आणि दोन आमदार आले होते. मात्र, त्यांना संजय राऊतांची भेट घेण्यास तुरुंग प्रशासनाने नकार दिला आहे. संजय राऊतांना भेटण्यासाठी राजकारण्यांना न्यायालयाचे आदेश किंवा परवानगी मिळाल्यावर त्यांची भेट होऊ शकते अशी माहिती तुरुंगातील सूत्रांनी दिली आहे.


आज संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी एक खासदार आणि दोन आमदार आर्थर रोड जेलमध्ये आले होते. त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडे राऊत यांची भेट घेण्याची विनंती केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, तुरुंग प्रशासनाने खासदार आणि आमदारांना संजय राऊत यांची भेट नाकारली आहे. तुरुंग नियमावलीनुसार केवळ रक्ताच्या नात्यातील कुटुंबीयच त्यांना भेटू शकतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली आहे. त्यामुळे त्यांचा भाऊ आणि कुटुंबातील सदस्यांना त्यांना भेटण्याची परवानगी दिली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.


पत्राचाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना सोमवारी विशेष पीएमएलए न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. राऊत यांना औषधे आणि घरचे जेवण देण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. त्यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे. राऊत यांची ईडी कोठडी 8 ऑगस्टला समाप्त झाली होती. ईडीने सोमवारी राऊत यांना विशेष न्यायालयात उपस्थित केले होते. राऊत यांच्या अतिरिक्त कोठडीची आवश्यकता नसल्याचे ईडीतर्फे विशेष न्यायालयाला सांगण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी राऊत यांची प्रकृती विचारात घेत त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेले आरोप


शिवसेना खासदार संजय राऊत यांचा पत्राचाळ घोटाळ्याशी थेट संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. त्यांचे भाऊ प्रविण राऊत पत्राचाळ डेव्हलेपमेंट पाहत होते. त्यांना HDIL ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले. त्यातील 1 कोटी 6 लाख 44 हजार रुपये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात पाठवले गेले. अलिबाग येथे याच पैशातून जमीन खरेदी करण्यात आली. राऊत परिवाराला पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारात थेट आर्थिक फायदा झाला आहे. या प्रकरणात ज्यांचं नाव सुरुवातीला समोर आलं होतं आणि ज्यांच्यावर कारवाई झाली होती ते प्रविण राऊत हे नावालाच होते, या प्रकरणातील खरे आरोपी संजय राऊत असल्याचा दावा ईडीने केला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: