मुंबई : माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या प्रकृती संदर्भातील बातम्या पूर्णपणे निराधार आहेत. सुमित्रा महाजन यांच्या मुलाने या संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला असून सुमित्रा महाजन यांनी तब्येत एकदम ठणठणीत असल्याचे सांगितले. तसेच समाजमाध्यमांवर पसरलेल्या बातम्यांचे खंडन केले आहे.


काँग्रेस नेते शशी थरुर यांनी अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात ट्वीट केले होते. त्यानंतर, अनेकांकडून सुमित्रा महाजन यांच्या प्रकृतीसंदर्भात ट्वीट करण्यात आले होते. मात्र, सुमित्रा महाजन यांच्यासंदर्भातील ते वृत्त खोटे असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली. आपल्या ट्वीटमध्ये ते म्हणाले, "ताई एकदम स्वस्थ असून.. त्यांना दीर्घायुष्य लाभो...!" कैलाश विजयवर्गीय यांच्या ट्वीटनंतर थरुर यांनी ट्वीट डिलीट केले आहे. त्यामुळे, ही बातमी अफवा असल्याचं स्पष्ट झाले.






सुमित्रा महाजन यांचे पुत्र मंदार महाजन म्हणाले की, "आईची तब्येत उत्तम आहे. सोशल मीडियावर आईच्या प्रकृतीविषयी ज्या उलटसुलट चर्चा झाल्या त्या अफवा असून कृपया त्यावर विश्वास ठेवू नका. मी संध्याकाळीच आईला भेटलो असून ती एकदम स्वस्थ आहे. आईची कोरोना चाचणी देखील निगेटिव्ह आहे."










सुमित्रा महाजन या 'ताई' म्हणून राजकीय वर्तुळात सुपरिचित आहेत. महाराष्ट्रातील चिपळूण ही त्यांची जन्मभूमी, तर इंदूर ही कर्मभूमी. 1989 पासून सुमित्रा महाजन खासदार म्हणून लोकसभेवर निवडून येत होत्या. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधून सुमित्रा महाजन तब्बल आठ वेळा लोकसभेवर निवडून आल्या. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडाळातही महाजन यांनी काम केलं आहे. गणेश मावळकर, शिवराज पाटील, मनोहर जोशी यांच्यानंतर सुमित्रा महाजन यांच्या रुपाने एका मराठी महिलेला लोकसभा अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला होता.