वसई-विरार : नाशिकमध्ये ऑक्सिजन यंत्रणेतील बिघाडामुळे 24 कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना मुंबईतील विरारमध्ये घडली आहे. विरारमधील कोविड रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात भीषण आग लागली असून यामध्ये तब्बल 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात एकूण 17 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी 13 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला आता यश आलं आहे. 


मध्यरात्री साडेतीन वाजता विरार पश्चिममध्ये असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागली. हे कोविड रुग्णालय असून या रुग्णालयात एकूण 39 रुग्ण उपचार घेत होते. प्राथमिक माहितीनुसार, अतिदक्षता विभागातील एसी कॉम्प्रेसरला आग लागली. या आगीत एकूण 13 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. आग लागल्यानंतर इतर रुग्णांना वसई-विरारमधील इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. 




मृतांची नावं :


उमा सुरेश कनगुटकर
निलेश भोईर
पुखराज वल्लभदास वैष्णव
रजनी आर कडू
नरेंद्र शंकर शिंदे
जनार्दन मोरेश्वर म्हात्रे
कुमार किशोर दोशी
रमेश टी उपयान
प्रविण शिवलाल गोडा
अमेय राजेश राऊत
रामा अण्णा म्हात्रे
सुवर्णा एस पितळे
सुप्रिया देशमुखे


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीयूमधील एसीचा स्फोट झाल्यानं ही भीषण आग लागली. त्यानंतर आयसीयूतील 4 रुग्ण आणि नर्सिंग स्टाफ बाहेर आले. तर सर्व नॉन कोविड रुग्ण सुखरुप असून त्यांना इतर रुग्णालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेलं आहे. 


वसई-विरार महापालिकेच्या महापौरांनी बोलताना सांगितलं की, "मध्यरात्री 3 वाजून 13 मिनिटांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तत्काळ अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. आयसीयूमध्ये 17 रुग्ण होते. दुर्दैवानं  त्यापैकी 13 रुग्णांचा मृत्यू झालाय. रुग्णालयातील एसीची स्फोट झाल्यामुळे आग लागली."