मुंबई : यवतमाळच्या नरभक्षक टी-वन वाघिणीची हत्या केल्याच्या मनेका गांधी यांच्या टीकेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं आहे. मनेका गांधींनी केलेली टीका माहितीच्या अभावी केलेली आहे. टी-1 वाघिणीला ठार करण्याचा निर्णय कोणी मंत्री किंवा सचिव घेत नाही. NTCA अर्थात राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणच्या गाईडलाईननुसार याबाबत निर्णय घेतला जातो, असं सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं.
मनेका गांधी यांचं वन्य प्राण्यांवर प्रेम आहे, पण त्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांचाही विचार मला करावा लागतो, असा टोलाही मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना लगावला.
पाच जणांचा बळी गेले तेव्हाचं टी-1 वाघिणीला पकडण्याचे आदेश दिले होते. मात्र हायकोर्टातून त्यावर प्राणी प्रेमींनी स्थगिती आणली. त्यानंतर मृतांचा आकडा 13 वर गेल्याची माहिती, मुनगंटीवार यांनी दिली. वन विभाग वाघिणीचे शत्रू नाही. वन कर्मचारी जोखीम पत्करून वनाचं संरक्षण करतात, हे सांगायलाही सुधीर मुनगंटीवार विसरले नाहीत.
शेवटच्या टप्प्यात बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाघिणीने उलटून हल्ला केला, तेव्हा नाईलाजाने तिला ठार करावं लागल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. शाफत अली खान यांची बिहार सरकारने 15 दिवसांपूर्वीच नियुक्ती केली. त्यांच्यावर गुन्हेगारीचे आरोप असतील तर त्या स्वतः केंद्रात मंत्री आहेत. त्यांनी वॉरंट काढून त्याला जेलमध्ये टाकावं. हे काम वन विभागाचे नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.
कायदेशीर मार्ग किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याऐवजी पाच न्यायमूर्तींची उच्च स्तरीय समिती नेमावी. केंद्रीय मंत्र्यांना तो अधिकार आहे, असा सल्लाही मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना दिला.
मनेका गांधी काय म्हणाल्या होत्या?
वाघिणीच्या हत्येनं मी अत्यंत दु:खी आहे. हा सरळसरळ गुन्हा असून, वाघिणीच्या बचावासाठी अनेकांनी आवाहन करुनही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट वाघिणीच्या हत्येचे आदेश दिले. वाघिणीच्या हत्येनं दोन निष्पाप बछड्यांना त्यांच्या आईच्या पश्चात मरणाच्या दारात नेऊन ठेवल्याचं मनेका गांधी म्हटलं.
आपण याबाबत कायदेशीर आणि राजकीय कारवाईबाबत विचार करत असल्याचंही मनेका गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं. तसेच शिकारी शाफत अली हा गुन्हेगार असून त्याने आतापर्यंत अनेक वन्य प्राण्यांना मारल्याचा आरोपही गांधी यांनी केला.
दरम्यान, दहशत निर्माण करणाऱ्या यवतमाळच्या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. या वाघिणीला आधी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने तिला गोळी घालण्यात आली. वन विभागाने दिलेल्या या माहितीवर संशय उपस्थित करण्यात येत आहेत. बेशुद्ध करण्याचे प्रयत्न न करता थेट तिला गोळी घालण्यात आली आणि त्यानंतर केवळ छायाचित्रासाठी या वाघिणीला डार्ट लावण्यात आला, असा संशय वन्यप्रेमी व्यक्त करीत आहेत.
अवनी वाघिणीच्या मृत्युची बातमी आली, त्या क्षणापासून वन्यजीवप्रेमींच्या विविध सामाजिक संघटनांकडून या प्रकियेबाबत संशय व्यक्त करणे सुरू झाले होते. शुक्रवारी रात्री वाघिणीला ठार मारताना कुणीही पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे, नियमांचे उल्लंघन करून ही वाघिणीला ठार मारण्यात आल्याचे आरोप मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत, तर वन्यजीव प्रेमिंकडून घेतलेले आक्षेप वन विभागाने फेटाळून लावले आहेत.
संबंधित बातम्या
टी-1 वाघिणीची हत्याच, मनेका गांधींचं मुनगंटीवारांवर शरसंधान